लोकसत्ता टीम

बुलढाणा : “आले वारी करूनी महाराज, शेगांवी असे ज्याचा वास” या सार्थ वर्णनानुसार श्री संत गजानन महाराजांची पालखी श्री क्षेत्र पंढरपूर पायदळ वारी पूर्ण करून आज रविवारी, ११ ऑगस्ट रोजी आपल्या स्वगृही, संत नगरी शेगाव येथे परतली. अंगावर ऊन-पाऊस झेलत तब्बल १३०० किलोमीटरचा खडतर प्रवास करणारी पालखी अन् त्यात सहभागी सात एकशे वारकरी संतनगरीत दाखल झाले. वारीच्या अंतिम टप्पात, खामगाव ते शेगाव दरम्यानच्या १६ किलोमीटर अंतराच्या वारीत लाखावर भाविक सहभागी झाले. वरून बरसणाऱ्या श्रावणधारा आणि भक्तिरसाने राज्यभरातील हे भक्तगण चिंब झाले.

पारंपरिक उत्साहात श्रींच्या पालखीचे, वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विठ्ठलाच्या नामाचा गजर, वीणा, टाळ-चिपळ्यांचा किणकिणाट, मृदंगांचा विशिष्ट ताल आणि घुमणारे भजनाचे स्वर अशा भक्तिमय वातावरणात आज रविवारी सकाळी पालखी शेगावच्या वेशीवर दाखल झाली.सकाळी ९ वाजता माऊली अभियांत्रिकी महाविद्यालयात ज्ञानेश्वरदादा पाटील, यांनी श्रींच्या पालखीचे पुजन करुन दर्शन घेतले.

आणखी वाचा-रेल्वेच्या ‘मेगा ब्लॉक’मुळे अनेक गाड्या रद्द

सकाळी १०:३० वाजता संत गजानन महाराज अभियांत्रीकी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर पालखीचे विधिवत पुजन आणि स्वागत करण्यात आले. श्री गजानन वाटिका येथे व्यवस्थापकीय विश्वस्त याच्या हस्ते गजानन महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोभावे दर्शन घेतले. श्री गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे यंदा ५५ वर्ष असल्याने या सोहळ्याला वेगळेच महत्व प्राप्त झाले. या पालखी सोहळ्यात शिस्तीचे भक्तीचे वातावरण पाहावयास मिळाले पालखीत पांढऱ्याशिभ्र पोशाखातील ७०० भगव्या पताकाधारी वारकरी एका रांगेत चालत होते . यात तरुनांचा सहभाग उल्लेखनीय होता.श्रीं च्या दर्शनासाठी पुढे येत होते. अग्रभागी असलेल्या अश्वाला स्पर्श करुन भाविक दर्शन घेत होते. पालखी मार्गावर स्थानिक भाविकांनी सडासंमार्जन करुन सुरेख रांगोळी रेखाटुन पालखीचे स्वागत केले. अनेक ठिकाणी भाविक ,कार्यकर्ते , सामाजिक संघटनांनी वारकऱ्यांसाठी चहा नाश्ता, फराळ, पाणी, अल्पोपाहाराची सोय करुन मनोभावे सेवा रुजू केली. श्रीची पालखी श्री गजानन वाटीकेवर पोहचताच या ठिकाणी वारकऱ्याना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

मंदिर प्रस्थान

वाटिका मध्ये विसावल्यावर दुपारी २ वाजता पालखी गजानन महाराज संस्थान मंदिराकडे मार्गस्थ झाली. जगदंबा चौक, तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, रेल्वे स्थानक, डाक विभाग कार्यलय, पोलीस ठाणे , पेट्रोल पंप, स्टेट बॅंकतर्फे, पालखीचे स्वागत करण्यात आले . पालखी अग्रसेन चौक, शिवाजी चौक, गांधी चौक, येथे संत गोमाजी महाराज संस्थानचे अध्यक्ष धनंजय दादा पाटील यांनी श्रींच्या पालखीचे पुजा करुन दर्शन घेतले.

आणखी वाचा-एसटी चालकाचे प्रसंगावधान अन् ८२ प्रवाशांचे वाचले प्राण…

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, संत गाडगेबाबा चौक, मार्गे श्रीची पालखी संध्याकाळी मंदिरात दाखल झाली. या ठिकाणी ज्ञानोबा तुकाराम, विठ्ठल माझ्या माझ्या, गजानन अवलिया अवतरले जग ताराया अभंग व रिंगण आणि महाआरती नंतर श्रींच्या ५५ पायदळवारी पालखी सोहळ्याची सांगता करण्यात आली.

पालखी मार्ग भाविकांनी फुलला

यापूर्वी काल शनिवारी शनिवारी खामगाव येथे मुक्कामी असलेल्या पालखीने आज पहाटे साडेपाच वाजता शेगाव कडे प्रस्थान केले.
शनिवार व रविवार पासुन रिमझिम पाऊस सुरू असुन वारीत भाविकांची संख्या कमी झाली नाही तर मागील वर्षी पेक्षा अधिकच होती. लाखावर भाविकांनी खामगांव शेगांव पायदल वारी करुन श्री गजानन महाराज मदिरात जाऊन दर्शन घेतले.

आणखी वाचा-जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचारी पुन्हा संपावर? समन्वय समितीच्या बैठकीत काय ठरले?

दर्शनासाठी दीर्घ रांगा

संत नगरीत लाखावर भाविक जमले होते.यामुळे श्रींच्या समाधी स्थळाचे दर्शनासाठी ३ तास लागत होते. श्रीमुख दर्शनाला देखील १ तास लागत होता.वाटिका व श्रींच्या मंदिरात जवळपास ८० हजार भाविकांनी महाप्रसाद लाभ घेतला. दरम्यान खामगांव शेगांव पालखी मार्गवर अनुचीत प्रकार घडु नये म्हणुन पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक बंदोबस्त लावण्यात आला. शहरात ठिकठिकाणी ४१६ पोलीस तैनात करण्यात आले होते. वाहनांमुळे भाविकांला त्रास होऊ नये या करीता वाहनांना शहरात बंदि करण्यात आली. शहरा बाहेरुन वाहने पुढे पाठविण्यात आली.