वर्धा : राजकीय नेते जे बोलतात, त्याकडे सर्वांचे लक्ष लागून असते. कधी कधी ते मार्मिक तर कधी सर्वांना कोड्यात टाकणारे बोलून जातात, आणि मग सर्व आपापल्या परीने अर्थ लावत बसतात. आज तसेच झाले. पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंढे जिल्हा दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यात त्यांनी मुख्य कार्क्रमाशिवाय अन्य ठिकाणी पण हजेरी लावली. आणि बोलता बोलता काही गंमतीही केल्या.
“पुढे नक्की येणार…”
या दौऱ्यात पंकजा मुंडे यांच्यासोबत अन्य नेते पण सहभागी झाले होते. त्यात एक असणारे माजी खासदार रामदास तडस हे म्हणाले की ताई, तुम्ही माझ्या २०१४ व २०१९ या दोन्ही लोकसभा निवडणुकीत प्रचारास आल्या होत्या. पण या वेळी आल्या नाही आणि मी पराभूत झालो. त्यावर आपल्या भाषणात मुंडे म्हणाल्या की, अरे हे असे आहे कां. ठीक तर पुढील लोकसभा निवडणुकीत जर तुम्हास तिकीट भेटली तर नक्की येणार आणि तुम्ही परत खासदार होणार. आणि असेही म्हटले की बाबा ( दिवं. गोपीनाथ मुंढे ) विदर्भातील लोकांबद्दल नेहमी बोलायचे. लहानपणापासून मी ऐकतेय की ते म्हणत विदर्भातील लोकं जीव लावतात. म्हणून मला इकडे यावसं वाटतं.
“देवाकडे मागू नका”
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर हे पूर्णवेळ त्यांच्या दौऱ्यात सहभागी झाले होते. केळझर येथील सिद्धिविनायक गणेशाची त्यांनी पूजा केली. आणि भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या की आपण देवाची पूजाअर्चा करतो. नैवैद्य ठेवतो आणि मागणे पण मागतो. पण असे करू नये. पूजा करा. नम्र व्हा. प्रसाद वाटा. पण काही मागू नका. देव तुम्हास जे द्यायचे ते देईलच. मागता कशाला, असा प्रश्न त्यांनी युवकांना टाकला.
एका मात्रेचा फरक
पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्याविषयी त्या भरभरून बोलल्या. म्हणाल्या की त्यांच्यात (पंकज) व माझ्यात (पंकजा) तर केवळ एका मात्रेचा फरक. अन्यथा काही नाही. ते सभागृहात नेमके बोलतात. विरोधकांना आवाजाने नव्हे तर युक्तीवादाने गप्प करतात. पंकजदादा म्हणजे हुशार माणूस. त्यांचे उत्तर विरोधकांना निरुत्तर करते, अशी ग्वाही पंकजा मुंडे यांनी देताच टाळ्यांचा कडकडाट झाला.
समाधान शिबीर
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर केळझर येथे पार पडले. पंकजा मुंडे यांनी मार्गदर्शन केले. या शिबिराचा मुख्य उद्देश म्हणजे समाजातील विविध घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचवणे आणि गरजू लाभार्थ्यांना थेट मदत करणे हा होता. यावेळी अनेक लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांना पुढील शासकीय सुविधांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याच्या हेतूने सायकलींचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अधिक सोयीचे होणार असून त्यांच्या शिक्षणाला चालना मिळणार आहे. यासोबतच शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आणि त्यांच्या दैनंदिन कामात सुलभता यावी म्हणून ट्रॅक्टरचेही वितरण करण्यात आले, ज्यामुळे शेती व्यवसाय अधिक सक्षम होण्यास मदत होईल. शासनाच्या या उपक्रमामुळे सामान्य जनतेपर्यंत विकासाच्या योजना प्रत्यक्षात पोहोचत असल्याचे मत डॉ. भोयर यांनी व्यक्त केले.चित्र पाहायला मिळाले. यावेळी अँड. शीतल भोयर, माजी खासदार रामदास तडस, भाजपा जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, आयोजक अशोक कलोडे व देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते
