अमरावती : संपूर्ण राज्यभरात चर्चेचा विषय ठरलेल्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणात दुसऱ्या क्रमांकाच्या आरोपीच्या विरोधात आणखी एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, दरम्यान काल या प्रकरणात एका १५ वर्षीय पीडित मुलीचा जबाब नोंदवण्यात आला होता, तो मूळ गुन्ह्याच्या तपासात जोडण्यात आला आहे, अशी माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आणखी एका गुन्ह्याची नोंद
विशाल आनंद यांनी सांगितले की, गुन्ह्यातील आरोपी उजेर खान इकबाल खान (वय २० वर्ष रा. परतवाडा) हा परतवाडा येथील एका १६ वर्षीय मुलीच्या संपर्कात होता. ही बाब पीडितेच्या पालकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपीला तसे न करण्याबाबत समजावून सांगितले होते. परंतु त्यानंतरही आरोपीने पिडीतेला मोबाईल फोनद्वारे संपर्क करणे चालू ठेवल्याचे पिडीतेच्या पालकांच्या निदर्शनास आले. त्यावरून पिडीतेच्या आईने परतवाडा पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष तपास पथकाच्या देखरेखीखाली या गुन्ह्याचा तपास करण्यात येत आहे.
पीडितेचा जबाब महत्त्वाचा
प्रकरणात एका १५ वर्षीय पिडीतेने पोलीसांसमोर जबाब देण्याची सहमती दर्शविल्यानंतर विशेष तपास पथकातील महिला पोलीस अधिकारी तसेच महिला व बाल कल्याण अधिकाऱ्यांसमोर पीडितेचा जबाब नोंदविण्यात आला आहे, हा जबाब मूळ गुन्ह्याच्या तपासात जोडण्यात आला आहे.
आणखी ५ मोबाईल जप्त
या प्रकरणात आरोपींकडून जप्त करण्यात आलेले ५ मोबाईल यापूर्वीच तांत्रीक विश्लेषणाकरिता न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून या व्यतिरिक्त जप्त करण्यात आलेले इतर ६ मोबाईल, १ लॅपटॉप, १ टॅब आणि एक हार्ड डिस्क त्वरीत विश्लेषणासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत, असे पोलीस अधीक्षकांनी सांगितले.
आतापर्यंत आठ जणांना अटक
आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईलमध्ये ८ पीडित मुलींच्या १८ चित्रफिती आणि ३९ छायाचित्रे आढळून आली. या चित्रफिती इतरांना प्रसारित करणाऱ्या इतर ७ आरोपींना देखील तपासादरम्यान अटक करण्यात आली. आतापर्यंत एकूण ८ आरोपींना अटक करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षकांनी सांगितले. पोलीस विभागामार्फत इतरही पीडितांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी कोणत्याही दडपणाला किंवा भीतीला बळी न पडता धैर्याने समोर येऊन आपला जबाब नोंदवावा. जबाब देण्यासाठी पुढे येणाऱ्या प्रत्येक पीडितेची ओळख पूर्णपण गप्त ठेवण्याची कायदेशीर खबरदारी पोलिसांकडून घेतली जात आहे.
