सरपंच म्हणजे गावचा कर्णधार. तो गावाचे भले करणार, असा विश्वास ग्रामस्थांना असतो. त्यामुळे त्याने केलेली सूचना अंमलात आणल्या जाते. मात्र या प्रकरणात सरपंचाने केलेली सूचना शालेय विद्यार्थ्यांच्या चांगल्याच अंगलट आली. सरपंचाने खोटी माहिती देत फसवणूक केल्याने शालेय विद्यार्थ्यांना जंगलात पायपीट करावी लागल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. आर्वीलगत खैरवाडा येथील विद्यार्थी एस.टी. बसने शहरात शिकायला येतात. घटनेच्या दिवशी सर्व विद्यार्थी वाढोणामार्फत बसफेरीने ब्राम्हणवाडाजवळ पोहचले होते. यावेळी रात्रीचे साडेसात वाजले होते. तेव्हा गावचे सरपंच दिलीप साठे यांनी समोर ट्रक फसलेला आहे. त्यामुळे बस पुढे जावू शकणार नाही, असे सूचित केले. बसच्या चालक व वाहकांनी ही सूचना ऐकून मुलामुलींना बसमधून खाली उतरवले. भररात्री पायपीट करत मुलामुलींना जंगलातील मार्गातून घरी जावे लागले. घरी यायला उशीर झाल्याने पालक चिंतेत होतेच. त्यांनी झालेली घटना पालकांना सांगितली. आम्हाला कुठेच ट्रक फसलेला दिसला नाही, असेही निदर्शनास आणून दिले. हेही वाचा >>> उच्च शिक्षण सचिव आणि संचालकांना अवमानना नोटीस, नागपूर विद्यापीठातील बोगस पदवी घोटाळ्याशी असा आहे संबंध… हे ऐकून पालक चांगलेच संतापले. ते सरपंचाच्या घरी जाब विचारायला गेले तेव्हा सरपंचाकडून उलटसुलट उत्तरे मिळाली. काय करायचे ते करून घ्या, असेही सरपंचाने सुनावले. संतप्त पालकांनी आर्वीच्या एस.टी. आगारप्रमुखांकडे धाव घेतली. सरपंचांनी चुकीचे वर्तन केले असले तरी सदर बसच्या वाहक व चालकाने खरी परिस्थिती समजून घेणे आवश्यक होते, असे पालकांचे म्हणणे होते. आगारप्रमुखांनी चालक व वाहकास विचारणा केली. सरपंचानेच समोर ट्रक फसलेला असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना उतरवून घेतले. लोकप्रतिनिधी असल्याने आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला. पण आमचीच फसवणूक झाली, असे त्यांनी सांगितले. हेही वाचा >>> प्राध्यापक चांगले शिकवतात म्हणून दुसऱ्या ठिकाणी नोकरीसाठी ‘एनओसी’ नाही, उच्च न्यायालयात अजब प्रकरण… या कृत्यास जबाबदार कोण, असा प्रश्न पडलेल्या पालकांनी प्रहार सोशल फोरमचे बाळा जगताप यांच्या नेतृत्वात आर्वी आगारात धरणे आंदोलन केले. यात गावकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने आगारप्रमुखांनी चालक व वाहक यांना पोलिसांकडे तक्रार करण्याची सूचना केली. आता खरांगणा पोलिसांकडे तक्रार नोंदवून घेण्याची कारवाई सुरू असल्याची माहिती जगताप यांनी दिली. सरपंचाने केलेली बनवाबनवी, पालकांशी उर्मट वागणूक तसेच विद्यार्थ्यांना करावा लागलेला संकटाचा सामना लक्षात घेऊन याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे. विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी अंधारात बसमधून खाली उतरावे लागले. येथून गावापर्यंत चिखल तुडवत पायपीट करावी लागली. हा जंगलातून जाणारा रस्ता असून बिबट, अस्वल, साप या प्राण्यांचा मुक्त वावर असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी घरी येताना मुलांना दुखापत होण्याची दाट शक्यता होती. परंतु याचा कोणीही विचार केला नाही, अशी चिंता संगीता कोरपे, शारदा खंडाळे, रेखाबाई झामरे, रेखाबाई उईके, ज्योस्ना कोरडे, मायाबाई तायडे, रसिका काळे आदी पालकांनी व्यक्त केली.