बुलढाणा : मध्यपूर्व आशियात सुरु असलेल्या युद्धाचा फटका जिल्ह्यातील औद्योगिक शहर असलेल्या खामगाव येथील औद्योगिक वसाहतीला सुद्धा बसला आहे.

​ युद्धाचे पडसाद आता थेट खामगाव मधील स्थानिक उद्योगांवर उमटू लागले आहेत.
खामगाव येथील ‘शिवांगी बेकर्स’ कंपनी ही प्रसिद्ध ‘पार्ले-जी’ बिस्किटांचे उत्पादन करते. बिस्कीट उत्पादन साठी मोठ्या आकाराचे विशिष्ट सिलिंडर लागतात. मात्र हा गॅसच उपलब्ध नसल्याने सुप्रसिद्ध पारले जी चे उत्पादन मागील सुमारे दहा दिवसापासून बंद पडले आहे.

तुटवड्याची चिन्हे

यामुळे कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होत असतानाच शेकडो कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ​पारले जी ही या क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे.शिवांगी बेकर्समध्ये प्रामुख्याने ‘क्रीम’ आणि ‘ग्लुकोज’ बिस्किटांचे उत्पादन घेतले जाते. प्राप्त माहितीनुसार यामध्ये पिढ्यानंपिढ्या आबालवृद्धांचे आवडते बिस्कीट असलेल्या पारले जी ( ग्लुकोज ) बिस्कीट सह ऑरेंज, पाईनापल, इलायची आदि सात चवीच्या ( फ्लेवरचे ) बिस्कीटचे उत्पादन केले जाते.

भव्य ओव्हनच्या मदतीने निर्मिती

येथील बिस्किट बनवण्याचे काम मोठ्या आकाराच्या ओव्हन च्या मदतीने केले जाते. ते पूर्णपणे मोठ्या आकाराच्या गॅसवर चालतात.मात्र, अमेरिका, इस्त्राईल आणि इराण मधील युद्धामुळे व्यावसायिक गॅस पुरवठ्यावर मर्यादा आल्या आहेत.यापरिणामी, कंपनीला आवश्यक असलेला गॅस पुरवठा खंडित झाला असून, ‘ग्लुकोज ओव्हन’ सह संपूर्ण उत्पादन प्रक्रिया थांबवावी लागली आहे. ​या कंपनीत कार्यालयीन कर्मचारी मिळून ५५० हून अधिक कामगार कार्यरत आहेत. या सर्वांसह त्यांच्या परिवारातील सदस्यांचा उदरनिर्वाह पूर्णपणे पारले कंपनीवर अवलंबून आहे.उत्पादन बंद राहिल्याने या कामगारांच्या कुटुंबासमोर आर्थिक पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. “कंपनी लवकर सुरू झाली नाही, तर कामगारांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागेल,”अशी भीती कंपनीच्या प्रतिनिधींनी व्यक्त केली आहे.

दररोज लाखो रुपयांचा फटका

बिस्किटे ही जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत येतात. शिवांगी बेकर्समधून होणारे उत्पादन थांबल्यामुळे येत्या काळात बाजारपेठेत पार्ले-जी बिस्किटांचा तुटवडा जाणवण्याची दाट शक्यता आहे. ​उत्पादन पूर्णपणे ठप्प असल्याने कंपनीला दररोज लाखो रुपयांचा फटका सोसावा लागत आहे. कच्च्या मालाची भरपूर उपलब्धता असली तरी गॅस नसल्याने सर्व यंत्रणा गंजण्याची भीती निर्माण झाली आहे. कंपनीने युद्धजन्य परिस्थिती लक्षात घेऊनही पूर्व नियोजन न केल्याने गॅसची अडचण निर्माण झाल्याची ओरड कामगारातून होत आहे.

कामगार मंत्र्यांचे दुर्लक्ष

दरम्यान खामगांव शहर हे राज्याचे कामगार मंत्री यांच्या खामगांव विधानसभा मतदारसंघाचा केंद्रबिंदू आहे. विधानसभेतच नव्हे खामगांव पालिका निवडणुकीत सुद्धा खामगांव वासियांनी भाजपला अर्थात फुंडकरांना पाठबळ दिले आहे. युती शासनाने त्यांना कामगार मंत्री हे महत्वाचे खाते दिले आहे. मात्र कामगार मंत्र्यांच्या शहरातील आणि तेही पारले जी सारखी कम्पनी केवळ गॅस तुटवड्यामुळे बंद पडणे त्यांच्यासाठी नामुश्किची बाब आहे.

नियोजन शून्य कारभार

दुसरीकडे कामगार प्रतिनिधी दीपक सुलताने आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद गायगोळ यांनी या प्रकाराबद्धल तीव्र नाराजी व्यक्त केली असून गॅस टंचाई ला कंपनीचा नियोजन शून्य कारभार जवाबदार असल्याचा आरोप केला. खामगांव चे आमदार तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी तातडीने यात हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा त्यांनी बोलून दाखविली. बंद काळातील पूर्ण पगार देण्याची मागणी त्यांनी व्यवस्थापनाकडे केली आहे. या बंद काळात कामगारांना अर्धा पगार देण्यात येणार आहे