एसटीच्या संपामुळे कारवाईस टाळाटाळ

महेश बोकडे

नागपूर : करोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील हजारो स्कूलबस चालकांनी त्यांच्या वाहनांची योग्यता तपासणी केली नाही. दुसरीकडे ऐन दिवाळीत एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संप केल्याने स्कूलबससह इतर खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीची परवानगी मिळाल्याने ते रस्त्यांवर आले आहेत. या वाहनांमुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण, हा प्रश्न अनुत्तरित आहे.

राज्यात सुमारे ३५ हजार स्कूलबस आहेत. करोनामुळे सलग दीड वर्षांपासून ही वाहने विना वापर उभी होती. ती पुन्हा सुरू करण्यासाठीचा खर्च काही हजारांचा घरात आहे. या खर्चाचा प्रश्न चालकांपुढे असतानाच परिवहन खात्याने ५ ऑक्टोबर २०२१ रोजी करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयांत स्कूलबसबाबत नियमावली पाठवली. त्याच्या  पालनासाठी मोठा खर्च बघता आणखी अडचणी वाढणार आहेत. दरम्यान, स्कूलबसची प्रत्येकवर्षी योग्यता तपासणी करावी लागते. ती केल्याशिवाय वाहने रस्त्यांवर चालवता येत नाही. परंतु ऐन् दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला.

अद्याापही कामगार सेवेवर यायला तयार नाहीत. त्यामुळे राज्यभऱ्यातील प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे शासनाने प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांसह स्कूलबसला प्रवासी वाहतुकीची परवानगी शासनाने दिली. त्यामुळे अनेक स्कूलबस चालकांनी जुळवाजुळव करत स्कूलबस दुरुस्त करत ती योग्यता तपासणी न करता त्यातून प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. परंतु या वाहनांचा अपघात होऊन कुणाचा जीव गेल्यास जबाबदार कोण? हा प्रश्न अनुत्तरित आहे. दरम्यान, राज्यातील काही आरटीओकडून प्रवाशांची कोंडी होऊ नये म्हणून संबंधितांवर कारवाई करता येत नसल्याचे मान्य केले जाते. त्यातच सध्या राज्यात शहरात आठवीपासून तर ग्रामीणला पाचवीपासून प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या असून काही प्रमाणात स्कूलबस विद्याार्थी वाहतूक करत आहेत.

परंतु त्याहून खालचे वर्ग सुरू झाल्यास योग्यता प्रमाणपत्र नसल्यास असल्या वाहनातून विद्यार्थी वाहतूक होऊन मुलांचेही जीव धोक्यात येण्याचा धोका वर्तवला जात आहे. या विषयावर परिवहन आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.

‘‘ सरकारने स्कूलबस चालकांच्या अडचणी बघता सर्वच कर माफ करण्याची मागणी केली आहे. सोबतच प्रत्येकाला  महिन्याला १० हजार रुपयांप्रमाणे आर्थिक मदत करावी. या सवलतीनेच स्कूलबस चालक पुन्हा आर्थिकद्ष्टय़ा स्वत:च्या पायावर उभा होऊ शकतो. तूतार्स प्रवाशांची शूरता बघत आवश्यक काळजी घेऊनच काही चालक प्रवासी वाहतूक करत आहे.’’

अफसर खान, अध्यक्ष (विदर्भ), स्कूल व्हॅन चालक संघटना, नागपूर.