नागपूर : नागपूर- मुंबई जलदगती महामार्ग म्हणून समृद्धी महामार्गाच्या ख्याती आहे. या महामार्गावर नागपूरहून मुंबईला निघालेली ट्रॅव्हल बस वाटेत बिघडली. त्यानंतर तब्बल ९ तास प्रवासी वाटेत मदतीसाठी ताटकळत राहिले. या घटनेबाबत आपण जाणून घेऊ या. मुंबईला निघालेली नागपूरच्या संजय ट्रॅव्हल्सची बस समृद्धी महामार्गावर जालना-छत्रपती संभाजीनगर दरम्यानच्या जंगल परिसरात शुक्रवारी मध्यरात्री २:३० वाजताच्या सुमारास अचानक बंद पडल्याने बसमधील जवळपास ४० प्रवाशांना अंधारात, भूक-तहान सहन करत रस्त्याकडेला मदतीच्या प्रतीक्षेत थांबावे लागले. निर्जन परिसर, काळोख आणि कुठलीच मदत नसल्याने प्रवाशांत भीतीचे वातावरण होते, असा थरारक अनुभव प्रवाशांनी सांगितला.
प्रवाशांनी सांगितल्यानुसार, पहाटेपासून सकाळी ११ वाजेपर्यंत ना मेकॅनिक पोहोचला, ना पर्यायी बसची व्यवस्था झाली. मदतीची कोणतीही ठोस हालचाल न झाल्याने प्रवासी महामार्गावरच अस्वस्थपणे वाट पाहत होते. रात्रीच्या काळोखात जंगल परिसरात अडकून पडल्याने प्रवाशांना भीतीच्या वातावरणात राहावे लागले. या बसमध्ये नागपूरचे बरेच प्रवासी होते. प्रवासी म्हणाले, मध्यरात्रीनंतर निर्जन ठिकाणी बस बंद पडल्याने भीती, अस्वस्थता आणि चिंता अशा परिस्थितीत हा कालावधी काढावा लागला.
ट्रॅव्हल्स चालकाचे म्हणणे काय ?
संजय ट्रॅव्हल्सचे शुभम चौरसिया यांनी सांगितले की, बसचा एअर पाइप फुटल्यामुळे बस बंद पडली. बस नव्याने खरेदी केलेली असल्याने संबंधित कंपनीच्या सर्व्हिस सेंटरशी संपर्क साधण्यात आला; मात्र आवश्यक पार्ट उपलब्ध नसल्याने दुरुस्तीत विलंब झाला. नाशिक, पुणे, मुंबई व नागपूर येथे स्टैंडबाय बसेस उपलब्ध होत्या, त्यांपैकी नाशिकहून सकाळी आठ वाजता पर्यायी बस पाठविण्यात आली. कंपनीच्या म्हणण्यानुसार, प्रवाशांना नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आली असून, सर्व प्रवाशांना पूर्ण भाडे परत करण्याची ऑफर देण्यात आली आहे. टोलनाक्याजवळ बस थांबविल्याने शौचालयाची सुविधा उपलब्ध झाल्याचेही कंपनीने स्पष्ट केले. मात्र, रात्रीच्या अंधारात जंगलात अडकून पडलेल्या भयावह अनुभव प्रवाशांसाठी थरकाप उडवणारा ठरला.
रात्री उशिराने पोहोचली पर्यायी बस
रात्री २:३० वाजता बस बंद पडल्यावर प्रवाशांना रस्त्यातच ताटकळत बसावे लागले. सुमारे पाच ते सहा तास ट्रॅव्हल्स कंपनीकडून कोणतीही ठोस मदत न मिळाल्याचा आरोप प्रवाशांनी केला. प्रवाशांनी संताप व्यक्त केल्यानंतर अखेर सकाळी आठ वाजता नाशिकहून पर्यायी बस खाना करण्यात आली. मात्र, मार्गातील अपघातामुळे ही बसही उशिराने पोहोचल्याचे सांगण्यात आले. यावर प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

