Patient health details attached Ayushman Bharat Health Card Nagpur news ysh 95 | Loksatta

रुग्णांच्या आरोग्याचा तपशील ‘आयुष्मान भारत’शी संलग्न

आयुष्मान भारत डिजिटल मिशन योजनेअंतर्गत ‘आयुष्मान भारत आरोग्य कार्ड’ (आभा कार्ड) वितरण प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

रुग्णांच्या आरोग्याचा तपशील ‘आयुष्मान भारत’शी संलग्न

महेश बोकडे

नागपूर : आयुष्मान भारत डिजिटल मिशन योजनेअंतर्गत ‘आयुष्मान भारत आरोग्य कार्ड’ (आभा कार्ड) वितरण प्रक्रिया वेगाने सुरू आहे. त्यासाठी रुग्णांची संपूर्ण माहिती ‘आयुष्यमान भारत’शी जोडण्याचे आदेश वैद्यकीय शिक्षण खात्याने सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना दिले आहेत. त्यामुळे सर्व शासकीय डॉक्टर रुग्णांच्या आरोग्याची माहिती एका क्लिकवर पाहू शकतील.

  आयुष्यमान भारत डिजिटल मिशन योजनेअंतर्गत देशातील सर्व शासकीय रुग्णालयांत या नोंदीबाबत स्वतंत्र सुविधा राहील. त्यामुळे रुग्णांच्या उपचाराची दिशा आणि त्याच्या तपासण्यांचा प्रत्येक अहवाल या यंत्रणेवर उपलब्ध होईल. हा रुग्ण कोणत्याही शासकीय किंवा या योजनेशी संबंधित रुग्णालयात गेल्यास तेथील डॉक्टर क्षणात त्याच्या आरोग्याचा तपशील पाहून उपचाराची दिशा ठरवू शकतील.

गरीब, उपेक्षित रुग्णाांसाठी ‘आयुष्मान भारत’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना मानली जाते. योजनेच्या उद्दिष्टांमध्ये डिजिटल आरोग्य प्रणाली स्थापन करणे, आरोग्य विदा केंद्र तयार करणे, क्लिनिकल आस्थापना, आरोग्य सेवा व्यावसायिक, आरोग्य कर्मचारी, औषधींचा एक स्त्रोत तयार करणे, आरोग्य नोंदणीची प्रणाली तयार करणे यासारख्या सेवांचा समावेश आहे. ही योजना २०२६ पर्यंत (पाच वर्षे) राबवण्यात येणार आहे.

‘आयुष्यमान भारत’ ही सर्वसामान्यांसाठी उत्तम योजना आहे. त्याचा लाभ जास्तीतजास्त नागरिकांना व्हावा, यासाठी वैद्यकीय शिक्षण खाते आवश्यक कार्यवाही करत आहे.

– राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण खाते, मुंबई</strong>

शासकीय रुग्णालयांना आदेश काय?

  • आयुष्मान भारत डिजिटल मिशन योजनेबाबत वैद्यकीय शिक्षण खात्याने सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना पत्र पाठवले आहे.
  • या योजनेंतर्गत रुग्णालयाची नोंदणी, अध्यापकापासून निवासी डॉक्टरांपर्यंतची नोंदणी करणे, शासकीय रुग्णालयांत तपासणी व उपचारासाठी येणाऱ्यांना तेथेच आयुष्यमान भारत आरोग्य खाते कार्ड देणे, इतरही नागरिकांसाठी येथे कार्ड तयार करण्याची सोय करणे, अशा सूचना त्यात देण्यात आल्या आहेत.
  • या कार्डबाबत जनजागृती, करणे, रुग्णालयात हेल्थ कार्डसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करणे, योजनेच्या अंमलबजावणीसाठी संस्थेत डॉक्टर-कर्मचाऱ्यांची कार्यशाळा घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-12-2022 at 00:02 IST
Next Story
नागपूर: सरपंच पदासाठी काँग्रेस आमदार झाले सक्रिय; ताकद पणाला लावून निवडून आणला आपलाच उमेदवार