मेडिकल-मेयोच्या अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

नागपूर :  मेडिकल आणि मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात रुग्णवाहिका म्हणून नोंद नसलेल्या वाहनांतून अवास्तव शुल्क घेऊन रुग्णांची लूट सुरू आहे. हा मुद्दा दोन्ही रुग्णालयांतील अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मंगळवारच्या बैठकीत मांडला. त्यावर आयुक्तांनी संबंधितांवर कारवाईच्या सूचना  केल्या. पोलीस जिमखाना येथे झालेल्या याबैठकीत पोलीस आयुक्तांसह मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सुधीर गुप्ता, मेयोच्या अधिष्ठाता डॉ. भावना सोनवने, मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश गावंडे, मेयोचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सागर पांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. नियम धाब्यावर बसवून मोठय़ा संख्येने रुग्णवाहिका उभ्या असतात. अनेकां रुग्णवाहिकांची आरटीओ कार्यालयात नोंद नसतानाही त्या नियमबाह्यपणे धावत असतात. या रुग्णवाहिका  अवास्तव दर आकारून सामान्यांची लूट करतात, या दरावर नियंत्रणासाठी काहीही यंत्रणा नाही. 

या रुग्णवाहिका येथील रुग्णांना विविध खासगी रुग्णालयातही पळवत असल्याच्या तक्रारी येत असतात. त्यातील चालक-वाहकांकडून येथे गुंडागर्दीही केली जाते, अशी तक्रार यावेळी मेयो आणि मेडिकलच्या अधिकाऱ्यांनी केली. सोबतच दोन्ही रुग्णालय परिसरात कुठेही वाहने लावली जात असल्याने होणाऱ्या समस्यांचीही माहिती दिली. दोन्ही रुग्णालय परिसराच्या द्वारावरील विविध विक्रेत्यांसह अतिक्रमणामुळे होणारा त्रास व येथील असामाजिक तत्वांचा वावर बघता दोन्ही रुग्णालयात पेट्रोलिंग वाढवण्याचीही मागणी बैठकीत केली गेली. त्यावर आयुक्तांनी  स्थानिक पोलिसांना  आवश्यक कारवाई करण्याची सूचना केली. सोबत रुग्णालय परिसरातील वाहन तळाच्या व्यतिरिक्त कुठेही वाहन लावणाऱ्या वाहनांवर दंड लावण्याबाबतही विचार करण्याचे आश्वासन दिले.