नागपूर : पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत हिवतापग्रस्त वाढले आहेत. २०२१ मध्ये १,१२३ हिवतापग्रस्त रुग्ण आढळले होते. ही संख्या जानेवारी ते एप्रिल २०२२ मध्ये १,९४३ रुग्णांवर पोहोचली. सर्वाधिक रुग्ण गडचिरोलीतील असून या भागात सर्वेक्षणाच्या कामात अचूकता आल्याने ही संख्या वाढल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
जागतिक हिवताप दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत नागपूरचे आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल म्हणाले, नागपूर विभागात २०२१ मध्ये गडचिरोलीत १,०७६ रुग्ण आढळले होते. यापैकी दोघांचा मृत्यू झाला. या काळात गोंदियात २०, चंद्रपूर १४, नागपूर (ग्रा.) १ तर वर्धा जिल्ह्यात १ रुग्ण आढळला. २०२२ जानेवारी ते एप्रिलदरम्यान गडचिरोलीत १,८९३ रुग्ण आढळले. यापैकी तिघांचा मृत्यू झाला. भंडारा १, गोंदिया ३५, चंद्रपूर १३ आणि नागपूर शहरात १ रुग्णाची नोंद झाली.
गडचिरोलीत १५ जोखमेतील प्राथमिक आरोग्य केंद्रात २ लाख नागरिकांचे रक्त तपासण्यात आले. त्यात १०८ जणांना हिवताप असल्याचे निदान झाले. काही तपासण्या अद्यापही सुरू आहेत. यंदा घरोघरी जाऊन तपासणी होत असल्याने रुग्ण जास्त दिसत आहे. रुग्णांवर वेळीच उपचार होत असल्यामुळे मृत्यूदरही कमी आहे. सहाय्यक संचालक (हिवताप) डॉ. एस. डी. निमगडे म्हणाले, हिवताप नियंत्रणासाठी यंदा पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यांत ७९० वैद्यकीय अधिकारी, ७२६ तालुका अधिकारी, २,९३२ आरोग्य सेवक व सेविकांसह सहायक पर्यवेक्षक, ७,५६१ आशा स्वयंसेवीकांना प्रशिक्षण देण्यात आले. सर्वसामान्यांमध्येही हिवतापाबाबत जनजागृतीही केली जात आहे.
काळजी घेऊन नियंत्रण शक्य
हिवताप टाळण्यासाठी परिसरात कुठेच पाणी जमणार नाही म्हणून काळजी घ्या, छतावरील पाण्याच्या टाकीला घट्ट झाकण बसवा, संडासच्या पाईपला जाळय़ा किंवा कापड बांधा, उन्हाळय़ात कुलरमध्ये गप्पीमासे सोडा, वॉटर कुलरच्या शेजारी पाणी जमू नये म्हणून काळजी घ्या, परिसरात छोटे तलाव व डबके असल्यास त्यात गप्पीमासे सोडा, आग विझवण्यासाठी असलेल्या वाळूच्या कुंडय़ांमध्ये पाणी जमा करू नका, यासह इतर आवश्यक काळजी घेतल्यास हिवतापावर नियंत्रण शक्य आहे, असे ग्लोबल हेल्थ स्टॅटर्जीचे सल्लागार डॉ. अरुण बामणे यांनी सांगितले.