नागपूर : नेपाळमध्ये अचानक अडकलेल्या पर्यटकांसमोर परतीच्या प्रवासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते. अखेर पाटणा-पूर्णा एक्स्प्रेसने त्यांच्या नागपूरकडे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पर्यटकांना मोठा दिलासा मिळाला असून, आता ते सुरक्षितपणे घरी परतण्याच्या मार्गावर आहेत.

नेपाळमधील अचानक आलेला पूरानंतर काठमांडूमध्ये अडकलेल्या नागपूर जिल्ह्यातील १०६ भाविकांच्या परतीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापैकी १०२ जण रेल्वेने नागपूरकडे रवाना झाले असून, चौघे विमानाने परतले आहेत. रविवारी पहाटे सर्वांच्या नागपुरात आगमनाची शक्यता आहे.

जनकपूरमार्गे भारतात प्रवेश

नागपूर जिल्ह्यातील सुमारे १०६ नागरिकांचा समूह २२ ऑगस्ट रोजी श्री. स्वामी महाराज यांच्या समूहासोबत पर्यटन आणि धार्मिक भेटीसाठी काठमांडूला गेला होता. या समूहात प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. दरम्यान, २६ ऑगस्ट रोजी नेपाळमध्ये फ्लॅश फ्लडची घटना घडल्याने या भाविकांच्या सुरक्षिततेबाबत कुटुंबीयांमध्ये चिंता निर्माण झाली होती. मात्र, नैसर्गिक आपत्तीचा समूहातील नागरिकांवर कोणताही प्रतिकूल परिणाम झाला नसल्याचे जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

बससेवा न मिळाल्याने पर्यायी व्यवस्था

परतीच्या प्रवासासाठी नियोजित बससेवा उपलब्ध न झाल्याने नेपाळ प्रशासनाने पर्यायी बसेसची व्यवस्था केली. त्यानुसार २७ ऑगस्ट रोजी भाविकांना काठमांडूहून जनकपूरमार्गे नेपाळ-भारत सीमेच्या दिशेने रवाना करण्यात आले. भारतात प्रवेश केल्यानंतर पुढील प्रवास रेल्वेने करण्यात आला. पाटणा येथे पोहोचल्यानंतर १०२ नागरिकांनी पाटणा-पूर्णा एक्स्प्रेसने नागपूरच्या दिशेने प्रवास सुरू केला. या प्रवासादरम्यान जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांच्या स्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्तीनंतर सुरक्षितपणे भारतात परतल्यानंतर कुटुंबीयांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

रविवारी पहाटे नागपुरात पोहोचणार

गाडी क्रमांक १७६०९ पाटणा-पूर्णा एक्स्प्रेस रविवारी, ३० ऑगस्ट रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर पोहोचण्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. पाटणा जंक्शनहून सकाळी ७ वाजता सुटणारी ही गाडी नागपुरात पहाटे ४.३५ वाजता पोहोचते. येथे सुमारे पाच मिनिटांचा थांबा असून त्यानंतर गाडी पूर्णा जंक्शनकडे रवाना होते. आठवड्यातून शनिवारी धावणाऱ्या या गाडीचा एकूण प्रवास सुमारे ३२ तासांचा आहे.
नागपुरात भाविकांच्या आगमनानंतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. प्रवासादरम्यानही संबंधित यंत्रणांकडून त्यांच्या हालचालींचा आढावा घेतला जात आहे.

चौघे विमानाने परतले

समूहातील इंदिरा चौधरी, सुलोचना खापरे, दीपक पांडे आणि वर्षा उपाध्याय या चौघांनी विमानाने परतीचा प्रवास केला. २८ ऑगस्ट रोजी दुपारी त्यांनी काठमांडूहून विमानाने दिल्ली गाठली. त्यानंतर रात्री आठच्या केरळ एक्स्प्रेसने नागपूरकडे प्रस्थान केले. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्या नागपुरात आगमनाची अपेक्षा होती. त्यामुळे समूहातील सर्व १०६ नागरिकांच्या परतीची व्यवस्था पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.