ज्येष्ठ हिंदूी साहित्यिक सागर खादीवाला यांचा सवाल; ‘लोकसत्ता’ कार्यालयाला सदिच्छा भेट
नागपूर : साहित्य क्षेत्रातील ५३ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये माझ्यावर कुणी विशिष्ट विचारधारेचा ठपका ठेवला नाही. मी कधी देशविरोधी किंवा कुठल्या विशिष्ट विचारधारेला समर्पित लिखाण केले नाही. असे असतानाही कुणी माझ्या साहित्याचा अभ्यास न करता केवळ द्वेषाच्या राजकारणासाठी माझी देशभक्तीपर कविता नाकारत असेल तर ते राष्ट्रभक्त कसे, असा रोखठोक सवाल ज्येष्ठ हिंदूी साहित्यिक डॉ. सागर खादीवाला यांनी केला.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.कॉम. द्वितीय वर्षांसाठी असलेल्या ‘पारिजात’ या पुस्तकात डॉ. खादीवाला यांची ‘देशभक्ती की स्याही’ ही कविता प्रकाशित करण्यात आली आहे. यावरून विद्यापीठाचे सत्ताबाह्य केंद्र असलेल्या एका शिक्षक संघटनेच्या प्रमुखांकडून खादीवाला आपल्या विचारांचे नाहीत, असा आरोप करीत या कवितेला विरोध करण्यात आला. या पाश्र्वभूमीवर खादीवाला यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला भेट देत त्यांची कविता आणि वर्तमान स्थितीवर चर्चा केली.
डॉ. खादीवाला म्हणाले, जात, धर्माच्या नावावर द्वेषाचे राजकारण करण्याचा प्रकार हल्ली वाढला आहे. माझ्या घराशेजारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक लोक राहतात. त्यातील काही पदाधिकारीही आहेत. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनासुद्धा मी माझे पुस्तक भेट दिले. त्यांनी पुस्तकाचे कौतुकही केले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माझ्या ‘हायकू’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन केले. अन्य पक्ष, संघटनांच्या नेत्यांशी, साहित्यिकांशीही माझे असेच जवळचे संबंध आहेत. मात्र, माझा इतक्या वर्षांच्या कारकिर्दीमध्ये मी असे द्वेषाचे राजकारण कधीही पाहिले नव्हते. विविधतेने नटलेल्या देशासाठी हे चांगले नाही. तुम्ही शहराचे नाव बदलवा, सत्तेत राहण्यासाठी काहीही करा मात्र, ज्या कवितेत तरुणांमध्ये देशभावना रूजवण्याची क्षमता आहे अशा कवितेला विरोध करणे योग्य नाही. यातून तुमच्यातील द्वेष भावनेची जाणीव होते, असेही खादीवाला म्हणाले.
देशभक्तीची मक्तेदारी कुण्या एकाकडे नाही
माझा जन्म स्वातंत्र्य सैनिकाच्या घरात झाला. माझा वडिलांना स्वातंत्र्यलढय़ात १९२३ ला तुरुंगवासही झाला होता. ते बराच काळ सेवाग्रामला राहिले. पुढे जमनालाल बजाज यांनी त्यांना दक्षिण भारतात खादीच्या प्रचाराचे काम दिले. त्यातूनच आम्हाला खादीवाला नाव मिळाले. हा इतिहास समजून न घेता एका विशिष्ट विचाराचा ठरवले जाणे ही फार खेदाची बाब आहे. तुम्ही जर खरच देशभक्त आहात तर तुम्हाला हे ओरडून-ओरडून सांगायची गरज नाही. ते तुमच्या कृतीतूनच दिसायला हवे. देशभक्तीची मक्तेदारी कुण्या एकाकडे नाही, असेही खादीवाला ठणकावून सांगितले.
मी मानवतेच्या विचारधारेचा जोही आपल्या विरोधात बोलेल त्याचे तोंड बंद करा, असे राजकारण सध्या सुरू आहे. मात्र, सागर खादीवाला कुठल्या विचाराचा आहे असा सवाल जर कुणी करत असेल तर मी मानवता, प्रेम आणि बंधुभाव या विचारधारेचा आहे. माझा प्रत्येक साहित्यातूनही मी तसाच संदेश देण्याचा प्रयत्न केला, असे खादीवाला यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांना प्रत्येक विचाराचे शिक्षण द्या
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रत्येक विचारधारेचे शिक्षण देणे आवश्यक आहे. कुण्या एका विचारधारेची सत्ता म्हणजे त्यांचेच विचार शिकवावे, असे मुळीच होता कामा नये. हा प्रकार देशाच्या गौरवशाली इतिहासासाठी घातक आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना प्रत्येक विचारधारा शिकू द्या आणि काय योग्य, अयोग्य हे त्यांचे त्यांना ठरवू द्या, असेही खादीवाला म्हणाले.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !