अकोला : राज्यात ‘मिशन टायगर’वरून राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच एका निवडणुकीची देखील रणधुमाळी सुरू होती. हद्दवाढीच्या न्यायप्रविष्ट प्रकरणामुळे पातूर नगर पालिकेची निवडणूक प्रलंबित होती. आता ही निवडणूक घेण्यात आली आहे. पातूर नगर पालिकेच्या निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट आघाडीच्या उमेदवाराने मोठा विजय मिळवला. काँग्रेसचे हिदायत खान रुम खान यांनी एक हजार ६०१ मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराला पराभूत केले. सदस्य पदाच्या सर्वाधिक १० जागा काँग्रेस व शिवसेना ठाकरे गट आघाडीने जिंकत पातूर नगर पालिकेवर झेंडा फडकवला. या निवडणुकीत भाजप, शिवसेना शिंदे गटाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला.

नगराध्यक्ष पदासह २० सदस्यांची निवड

पातूर नगर पालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार, तर नगरसेवक पदासाठी ७५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. पातूर नगराध्यक्षपद हे खुल्या प्रवर्गासाठी आहे. नगराध्यक्ष पदासह १० प्रभागांतून २० सदस्यांची निवड करण्यासाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये ७४.३३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पातूर नगर पालिका निवडणुकीत भाजप स्वबळावर मैदानात उतरली होती. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाने आघाडी, तर शिवसेना शिंदे गट स्वतंत्र लढली. विकास योद्धा मंचामध्ये वंचित बहुजन आघाडी आणि एआयएमआयएम यांनी निवडणूक लढवली.

काँग्रेसचा मोठा विजय

या निवडणुकीत काँग्रेस-शिवसेना ठाकरे गट आघाडी आणि योद्धा मंचच्या उमेदवारांमध्ये लढत झाली. यामध्ये काँग्रेसचे हिदायत खान रुम खान यांना सहा हजार ००९ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी योद्धा मंचच्या हाजी सय्यद बुरहान यांना चार हजार ४०८ मते पडली. एक हजार ६०१ मतांनी काँग्रेस विजयी झाली. भाजपचे सचिन ढोणे तिसऱ्या स्थानावर गेले असून त्यांना दोन हजार ४०९ मतांवर समाधान मानावे लागले. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुभाष बोचरे यांना केवळ १९४ मते मिळाली.

काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट आघाडीचे वर्चस्व

पातूर नगर पालिकेच्या सदस्यांमध्ये सर्वाधिक १० जागा काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटाला मिळाल्या आहेत. विकास योद्धा मंचाला आठ जागा जिंकता आल्या. भाजपला केवळ दोन जागांवरच यश मिळाले. पातूर नगर पालिकेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी ११ सदस्यांची गरज आहे. काँग्रेस आठ व शिवसेना ठाकरे गट दोन असे दहा सदस्य त्यांचे निवडून आले. नगराध्यक्ष यांना एका सदस्याच्या मतदानाचा अधिकार असल्याने या आघाडीने ११ हा बहुमताचा जादुई आकडा गाठला आहे.

पातूर नगर पालिका पक्षीय संख्याबळ

  • नगराध्यक्ष – काँग्रेस

सदस्य

  • काँग्रेस – ०८
  • शिवसेना ठाकरे गट – ०२
  • भाजप – ०२
  • विकास योद्धा मंच – ०८
  • एकूण – २०