वर्धा : खासगी शाळांत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी भरती हा मोठा विषय असतो. राज्य शासनाने ही भरती वादग्रस्त ठरू लागल्यावर पवित्र पोर्टल मार्फत भरती प्रक्रिया राबविणे सूरू केले. मात्र त्यात व्यवस्थापनास पण भूमिका पार पाडायची आहे. त्या संदर्भात ही घडामोड.

आज मिळाली मुदतवाढ

राज्यातील शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आणि शैक्षणिक संस्थांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. ‘पवित्र प्रणाली’ (Pavitra Portal) मार्फत सुरू असलेल्या शिक्षणसेवक व शिक्षक पदभरती प्रक्रियेत व्यवस्थापनांना जाहिरातींची नोंद करण्यासाठी आता १० जुलै २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शासनाच्या शिक्षण विभागामार्फत आज यासंबंधीचे अधिकृत परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले.जाहिरातींची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

राज्यातील शाळांमध्ये शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी पवित्र प्रणालीमार्फत दि. ०१ मे २०२६ पासून स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनांना त्यांच्याकडील रिक्त पदांच्या जाहिराती नोंदवण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांच्या जाहिराती तयार करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आले आहे. मात्र, काही तांत्रिक बाबी आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापनांना अजून थोड्या कालावधीची आवश्यकता होती. हीच अडचण विचारात घेऊन, जास्तीत जास्त शाळांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता यावे म्हणून प्रशासनाने १० जुलै २०२६ पर्यंत मुदत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन

शिक्षण विभागाकडून राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी त्वरित हालचाली कराव्यात. जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी व्यवस्थापनांनी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in/ या अधिकृत संकेतस्थळाला (Website) भेट देऊन आपली नोंदणी विहित मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे.अडचणींच्या निवारणासाठी ईमेल सुविधा आहे. शैक्षणिक व्यवस्थापनांना पदभरतीची जाहिरात अपलोड करताना किंवा इतर कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास, त्यांच्या मदतीसाठी शिक्षण विभागाने edupavitra25@gmail. Com हा ईमेल आयडी जारी केला आहे. या ईमेलवर संपर्क साधून व्यवस्थापन आपल्या शंकांचे व अडचणींचे निरसन करू शकतात.

उमेदवारांना दिलासा मिळण्याची शक्यता

गेल्या अनेक महिन्यांपासून पवित्र पोर्टलद्वारे होणाऱ्या शिक्षक भरतीची लाखो डी.टी.एड., बी.एड. आणि टीएआयटी (TAIT) उत्तीर्ण उमेदवार चातकासारखी वाट पाहत आहेत. व्यवस्थापनांना मिळालेल्या या मुदतवाढीमुळे राज्यातील जास्तीत जास्त शाळांच्या रिक्त जागा पोर्टलवर येतील, ज्यामुळे एकूण जागांची संख्या वाढून बेरोजगार डी.एड, बी.एड धारकांना नोकरीच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता १० जुलैपर्यंत किती संस्था आपल्या जाहिराती नोंदवतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.