वर्धा : राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागातर्फे शिक्षक भरतीसाठी ‘ पवित्र ‘ ( Portal for Visible to All Teachers Recruitment ) ही संगणकीय प्रणाली राबविली जाते. पारदर्शकता आणण्यासाठी व गुणवत्ताधारकांना न्याय मिळावा, असा हेतू आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप कमी करून वशिलेबाजीस आळा घालण्याची भूमिका असते. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी ( TAIT ) मधील गुणांच्या आधारे पात्र उमेदवार निवडल्या जातात.

भरतीचे एकच व्यासपीठ

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी अनुदानित व अंशता अनुदानित शाळांतील शिक्षक भरती एकाच व्यासपीठावर आणली आहे. ही पवित्र पोर्टल प्रक्रिया विविध टप्प्यात होते. प्रथम नोंदणी ( Registration ) होते. उमेदवारांना त्यांची वयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता आणि TAIT परीक्षेतील गुण या पोर्टलवर नोंदवावे लागतात. विविध संस्था व सरकारी शाळा त्यांच्याकडील रिक्त पदांची जाहिरात पोर्टलवर प्रसिद्ध करतात. उमेदवार आपल्या पात्रतेनुसार कोणत्या जिल्ह्यात किंवा संस्थेत काम करण्यास ईच्छुक आहे, याचा पसंतीक्रम पोर्टलवर लॉग इन करून देतात.

२ एप्रिल २०२६ नुसार आता शालेय शिक्षण विभागाने आज २ एप्रिलच्या आदेशाने पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरती च्या कार्यपद्धतीत आवश्यक सुधारणा करणारा निर्णय आज घेतला आहे. जुन्या तरतुदीनुसार उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीसह व मुलाखतीशिवाय या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र असलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. मात्र उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीतज्यास्त एकूण ५० प्राधान्यक्रम लॉक करता येतील. सदर मर्यादा निवडीच्या दोन्ही प्रकांरासाठी स्वतंत्रपणे असेल.

नवी सुधारणा

आता आजच्या आदेशाने यात बदल करण्यात आला आहे. उमेदवारांना त्यांच्या अर्हतेनुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या निवडीच्या दोन्ही प्रकारासाठी जाहिरातीतील पात्र आसलेले सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील. मात्र मुलाखतीशिवाय या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी ज्यास्तीतज्यास्त एकूण १०० प्राधान्यक्रम लॉक करता येतील. तसेच मुलाखतीसह या निवडीच्या प्रकारासाठी उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी ज्यास्तीतज्यास्त एकूण ५० प्राधान्यक्रम लॉक करता येतील.असे शासन शुद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

पात्रता परीक्षा या पवित्र पोर्टलमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा ( TET / CTET ) उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. इयत्ता १ ली ते इयत्ता ८ वी साठी ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक ठरविण्यात आले आहे. पदाच्या गरजेनुसार डीएड, बीएड  किंवा संबंधित पदवी अपेक्षित.