अकोला : जागतिक पातळीवर देशाला महासत्ता बनवण्यासाठी सर्वाधिक टक्का असलेल्या कृषी क्षेत्रावर मोठी जबाबदारी असते. त्या दृष्टीने कृषी क्षेत्राच्या आमूलाग्र बदलासाठी नवतंत्रज्ञान तळागाळात रुजवण्याची नितांत गरज दिसून येते. कृषीचे ज्ञान अवगत केलेल्या कृषी पदवीधरांचे ते आता उत्तरदायित्व आहे. वातावरणीय बदलाच्या संकटाचे संधीमध्ये रूपांतर करावे, असे मत गुजरातमधील आनंद कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.बी. कथीरिया यांनी आज येथे व्यक्त केले.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा गुरुवारी आयोजित ४० व्या दीक्षांत समारंभात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे, कुलसचिव डॉ. सतीश ठाकरे, माजी कुलगुरू डॉ. विलास भाले, डॉ. गोविंद भराड यांच्यासह विद्यापीठाचे कार्यकारी परिषद सदस्य आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. के.बी. कथीरिया यांनी दीक्षांत भाषणात देशातील कृषी क्षेत्राची सद्यस्थिती आणि भवितव्यावर सखोल प्रकाश टाकला.
शिकणे ही आयुष्यभराची प्रक्रिया आहे. पदवी हा शिक्षणाच्या प्रवासातील मैलाचा दगड ठरतो. आव्हानांना समोरे जाण्यासाठी सदैव सज्ज राहिले पाहिजे. यशाचे रहस्य कठोर परिश्रमातच आहे. व्यावहारिक जीवनात ज्ञानाचा वापर खऱ्या पदवीधरांचे प्रतीक मानले जाते, असे डॉ. कथीरिया म्हणाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पीक उत्पादन दुप्पट करण्याची गरज आहे. उत्पादन ते बाजारपेठेपर्यंत मूल्य साखळी विकसित करून एकात्मिक शेती प्रणालीचा अवलंब करीत पिकांचे मूल्यवर्धन करावे, असे आवाहन त्यांनी केले. कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी अहवाल वाचन करून विद्यार्थ्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी ज्ञानाचा उपयोग करण्याची गरज व्यक्त केली.
दीक्षांत समारंभात बी.एससी कृषी एक हजार ९८६, उद्यानविद्या १९८, वनविद्या ४५, कृषी जैवतंत्रज्ञान ८६, कृषी व्यवसाय व्यवस्थापन ६६, बी.टेक अन्न तंत्रज्ञान ५३, कृषी अभियांत्रिकी ७१, पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये एम.एससी. कृषी २६७, उद्यानविद्या ३६, वनविद्या नऊ, एम.टेक कृषी अभियांत्रिकी १४, एमबीए ५७ व आचार्य पदवी ४८ असे एकूण दोन हजार ९३६ विद्यार्थ्यांना स्नातक, स्नातकोत्तर व आचार्य पदवी प्रदान केली. दीक्षांत समारंभात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला.
८५ पारितोषिकांनी ४७ गुणवंतांचा गौरव
दीक्षांत समारंभात ८५ पारितोषिकांचे वितरण ४७ गुणवंतांना मान्यवरांच्या हस्ते केले. यामध्ये ३२ सुवर्ण, रौप्य १६, रोख स्वरूपाचे ३४ आणि तीन पुस्तक स्वरुपात बक्षीस देण्यात आले. यावर्षी आचार्य पदवीमध्ये नल्ला चरीथा यांना सुवर्ण व रोख असे दोन पदके एम.एससी कृषीमध्ये दोन पदके प्रिती पुरी, उद्यानविद्यामध्ये संतनु मैती चार पदके, बी.एससी कृषीमध्ये सर्वाधिक सहा पदके सुदर्शन उंबरकर याने प्राप्त केले. उत्कृष्ट शिक्षक पारितोषिक प्रमाणपत्र व रौप्यपदक डॉ. ए.के. कांबळे यांना दिले. उत्कृष्ट कर्मचारी पारितोषिक वैभव फुलाडी, प्रवीण वानखडे यांना मिळाले.

