नागपूर : मध्य प्रदेशातील पेंच व्याघ्रप्रकल्पातून राजस्थानमध्ये पहिल्यांदाच एका वाघिणीचे स्थलांतर करण्यात आले आहे. ‘PN-224’अशी ओळख असलेल्या या तीन वर्षांच्या वाघिणीचे राजस्थानातील रामगढ विषधारी व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्याची महत्त्वाची मोहीम रविवारी रात्री साडेदहा वाजता यशस्वीरीत्या पार पडली. भारतीय हवाई दलाच्या ‘Mi-17’ हेलिकॉप्टरद्वारे हे स्थलांतर करण्यात आले.

एका राज्यातून दुसऱ्या राज्यात वाघांच्या संवर्धनासाठी तसेच वाघांच्या जनुकीय विविधतेत वाढ करण्यासाठी सुरू असलेल्या व्यापक योजनेतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. जयपूरहून वाघिणीला रस्तेमार्गे राजस्थानमधील रामगढ विषधारी व्याघ्रप्रकल्प (बुंदी) येथे नेण्यात आले. सुमारे अडीच तासांचा हा हवाई प्रवास होता. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, दोन राज्यांदरम्यान हेलिकॉप्टरद्वारे वाघिणीचे स्थलांतर होण्याची ही देशातील पहिलीच घटना आहे. रविवारी सकाळी पेंच व्याघ्र प्रकल्पात वनविभागाच्या पथकाने वाघिणीचा शोध सुरू केला.

दाट झाडीत ती विश्रांती घेत असताना आढळून आली. पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तिला यशस्वीरीत्या ताब्यात घेतले. तपासणीत तिचे शरीराचे तापमान, हृदयाचे ठोके आणि श्वसनक्रिया पूर्णपणे सामान्य असल्याचे आढळले. सुमारे एक तासांच्या प्रक्रियेनंतर दुपारी चार वाजून ५५ मिनिटांनी तिला हेलिकॉप्टरने उचलण्यात आले. सुरक्षेच्या कारणास्तव वाघिणीला थेट बुंदीऐवजी जयपूर येथे आणण्यात आले. त्यानंतर तिला रामगढ अभयारण्यात बजालिया एनक्लोजर मध्ये ठेवण्यात आले आहे. या स्थलांतराची तयारी गेल्या अनेक आठवड्यांपासून सुरू होती. २५ नोव्हेंबरला वरिष्ठ वनअधिकारी पेंचमध्ये दाखल झाले होते.

मूळ आराखड्यानुसार वाघिणीला १० डिसेंबरला स्थलांतरित करायचे होते, मात्र सहा डिसेंबरला तिची रेडिओ कॉलर तुटल्याने ही प्रक्रिया थांबवावी लागली. सुरुवातीला वाघिणीला थेट पेंचमधून रामगढला नेण्याची योजना होती. रामगढमध्ये हेलिपॅड तयार करण्यात आले होते आणि बुंदीमध्ये दोन दिवस हेलिकॉप्टर ट्रायल्सही घेण्यात आल्या. मात्र भारतीय हवाई दलाने सुरक्षेच्या कारणास्तव परवानगी नाकारल्याने संपूर्ण आराखडा बदलावा लागला.

त्यामुळे जयपूरमार्गे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या मोहिमेची तयारी सुमारे महिनाभर सुरू होती. तिच्या हालचाल, क्षेत्र आणि दैनंदिन वावर यावर लक्ष ठेवण्यासाठी कुरई व रुखाड रेंजमध्ये सुमारे ५० एआय-सक्षम कॅमेरा ट्रॅप व मोशन सेन्सर कॅमेरे बसवण्यात आले होते.

मिळालेल्या माहितीनुसार योग्य वेळ साधत वाघीण सुरक्षितपणे पकडण्यात आली. शनिवारी सर्व हालचाली पूर्वनियोजित आराखड्यानुसार करण्यात आल्या. वन्यजीव पशुवैद्यकांनी वाघीणीला अत्यंत काळजीपूर्वक बेशुद्ध केले आणि विशेष क्रेटमध्ये ठेवून ठरवलेल्या हेलिपॅडपर्यंत नेण्यात आले. रविवारी पहाटे Mi-17 हेलिकॉप्टरने उड्डाण घेतले. उड्डाणादरम्यान मध्यप्रदेश व राजस्थानमधील वरिष्ठ पशुवैद्यक आणि वनाधिकारी वाघिणीच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. रस्तेमार्गाऐवजी हवाई मार्ग निवडल्याने प्रवासाचा कालावधी कमी झाला आणि वाघीणीवरील ताणही कमी ठेवता आला, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. घनदाट जंगल व मानवी वस्ती टाळून हे स्थलांतर केल्याने सुरक्षितता वाढली.

रामगढ विषधारी व्याघ्र प्रकल्पात वाघिणीचे आगमन हे राजस्थानातील व्याघ्र संवर्धनासाठी महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.