नागपूर : पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात ‘संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला. ‘लोकसत्ता’ने याबाबतचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर पेंच प्रशासने महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याप्रकरणाची दखल घेत स्वत:हून जनहित याचिका दाखल करण्याचे निर्देश दिले.
नेमके प्रकरण काय?
पेंच व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्राजवळच ‘कोलितमारा संगीत महोत्सव’ आयोजित करण्यात आला होता. समाजमाध्यमातून याची जाहिरातही केली गेली. याबाबत ‘लोकसत्ता’ने वृत्त प्रकाशित करत वनविभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पर्यावरण संवेदनशील क्षेत्र मार्गदर्शक तत्त्वे, ध्वनी प्रदूषण नियंत्रण २०००, वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अशांतता कलम, वनविभागाचा व्यावहारिक सराव याशिवाय इतरही कायद्याअंतर्गत संरक्षित क्षेत्राजवळ अशा कोणत्याही उपक्रमांना परवानगी देता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने तीन महिन्यांपूर्वीच जंगलाच्या सीमेपासून काही किलोमीटरपर्यंत ‘शांतता क्षेत्र’ जाहीर करण्याचे निर्देश दिले. तर पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात आधीपासूनच हे नियम लागू आहे. या नियमाअंतर्गत निसर्ग शिबीर, आदिवासी नृत्य, आदिवासी संस्कृतीची ओळख पर्यटकांना करुन देता येते.
मात्र, गेल्या दोन वर्षांपासून या व्याघ्रप्रकल्पाच्या कोलितमारा क्षेत्रात शिबिराच्या नावाखाली पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच येथे व्हॅलेंटाईन डे, ३१ डिसेंबर यासारखे कार्यक्रम ‘द विकेन्ड एस्केपर्स’ने पेंच प्रशासनाच्या सहकार्याने घेतले. लोकसत्ताच्या बातमीनंतर पेंच प्रशासनाने हा महोत्सव रद्द केला होता. यानंतर प्रशासनाने स्पष्टीकरण देत यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी दिली नव्हती असे सांगितले. कोलीतमारा येथील ‘रिव्हरसाइड कॅम्पिंग’ वन क्षेत्राच्या बाहेर असून खासगी शेती क्षेत्रात आहे. स्थानिक आदिवासी महिला ते चालवतात आणि संगीत महोत्सव त्यांच्याच महिला बचत गटाने आयोजित केला होता, असे स्पष्टीकरणही प्रशासनाने दिले होते. आता या प्रकरणाची दखल स्वत: उच्च न्यायालयाने घेतली आहे.
दोन वर्षांपासून पार्ट्या सुरू
गेल्या दोन वर्षांपासून या व्याघ्रप्रकल्पाच्या कोलितमारा क्षेत्रात शिबिराच्या नावाखाली पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच येथे व्हॅलेंटाईन डे, ३१ डिसेंबर यासारखे कार्यक्रम ‘द विकेन्ड एस्केपर्स’ने पेंच प्रशासनाच्या सहकार्याने घेतले. गावातीलच एका आदिवासी तरुणाच्या शेतात काही पिकत नाही म्हणून बचतगटाला त्याने ही जागा खानावळ चालवण्यासाठी दिली, ज्यात त्याच्या घरच्या महिला देखील आहेत. मात्र, शिबिराच्या नावाखाली पेंच प्रशासनाला सोबत घेऊन ‘द विकेन्ड एस्केपर्स’ ने याठिकाणी पार्ट्या आयोजित केल्या. बरेचदा या महिला बचत गटावर दबाव टाकून कमी किंमतीत किंवा फुकटात जेवण द्यायला भाग पाडले गेले.

