नागपूर : जंगलात जिप्सीमधून वाघाच्या मागावर जाण्याचा अनुभव पर्यटकांनी घेतला आहे. पण आता पेंचमध्ये वाघ, गवे, चितळ किंवा मोर नदीकाठी पाणी पिण्यासाठी आलेले असताना त्यांना पाण्यातून, तेही सौरऊर्जेवर चालणाऱ्या शांत बोटीतून पाहण्याची संधी मिळणार आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पात २०२६-२७च्या पर्यटन हंगामासाठी ‘सोलर बोट सफारी’ सुरू करण्यात आली आहे. केरळहून दाखल झालेल्या प्रत्येकी २४ पर्यटक क्षमतेच्या दोन प्रीमियम सोलर बोटी पर्यटकांना पेंचच्या जलविश्वाची सफर घडवणार आहेत.

जंगलाची सफारी आतापर्यंत जमिनीवरून; आता पाण्यातूनही!

पेंच नदीच्या पात्रातून होणाऱ्या या सफारीचे दोन मार्ग निश्चित करण्यात आले आहेत. पहिला मार्ग कोलीतमारा ते नांदपूर/नगारागोटा असा सुमारे ८ ते १० किलोमीटरचा आहे. या मार्गावर नांदपूर कुटी येथे पर्यटकांना विश्रांती घेता येणार आहे. दुसरा मार्ग मात्र अधिक लांबचा असून कोलीतमारा ते कुंवारा भिवसेन आणि पुन्हा कोलीतमारा असा सुमारे २५ ते २८ किलोमीटरचा जलप्रवास असेल. या मार्गावर घनदाट जंगलासोबतच प्राचीन कुंवारा भिवसेन देवस्थान पाहता येणार आहे.

वाघ दिसेल? मगरीही दिसणार!

या जलसफारीचे आणखी एक आकर्षण म्हणजे पेंच नदीचे जलचर आणि नदीकाठचे वन्यजीव. पाणी पिण्यासाठी नदीकाठी येणारे वाघ, गवे, चितळ, सांबर, भेकर आणि मोर पर्यटकांना सुरक्षित अंतरावरून पाहता येऊ शकतात. नदीपात्रात मगरींचेही दर्शन घडू शकते. पक्षिनिरीक्षकांसाठीही ही सफारी महत्त्वाची ठरणार आहे. चित्रबलाक, ब्लॅक स्टॉर्क, डार्टर, ग्रे हेरॉन, ब्लॅक-हेडेड आयबिस, फिश ईगल आणि विविध प्रजातींचे खंड्या यांसह स्थानिक तसेच स्थलांतरित पक्षी पाहण्याची संधी मिळणार आहे.

आवाजविरहित सफारी; सौरऊर्जेवर बोटी

या बोटींचे वैशिष्ट्य म्हणजे त्या पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणार आहेत. त्यामुळे इंजिनाचा आवाज आणि प्रदूषण टाळून पेंचच्या संवेदनशील परिसंस्थेत जलप्रवास करता येणार आहे. वन्यजीवांना त्रास न देता निसर्गाचा अनुभव देणे हा या पर्यावरणपूरक पर्यटन उपक्रमाचा उद्देश आहे.

किती रुपये मोजावे लागणार?

पहिल्या मार्गासाठी आठवड्याच्या दिवशी प्रति व्यक्ती ४०० रुपये, तर शनिवार-रविवारी ५०० रुपये शुल्क आहे. या मार्गावर सकाळी ६ ते ८, ८.३० ते १०.३०, ११ ते १, दुपारी १.३० ते ३.३० आणि ४ ते ६ अशा पाच फेऱ्या असतील. दुसऱ्या मार्गासाठी आठवड्याच्या दिवशी ८०० रुपये, तर शनिवार-रविवारी १,१०० रुपये प्रति व्यक्ती शुल्क आहे. या मार्गावर सकाळी ६ ते ९, १० ते १ आणि दुपारी २ ते ५ अशा तीन फेऱ्या ठेवण्यात आल्या आहेत.

ऑनलाइन बुकिंग कुठे?

सोलर बोट सफारीसाठी पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध आहे. तसेच कोलीतमारा येथील मंको वन टुरिझम कॉम्प्लेक्सच्या बुकिंग काऊंटरवरून ऑफलाइन बुकिंग करता येणार आहे.