scorecardresearch

नागपूर: समृद्धीचे वाटसरू ठरले वानरासाठी देवदूत! आईने पिलासाठी जीव गमावला, पिल्लाला वाटसरुनी वाचवले

उपचारादरम्यान माकडाचा तर मृत्यू झाला पण तिचे पिल्लू मात्र सुखरूप वाचले.

monkey death
मादी वानराने आपल्या पिल्लाला स्वतः पासून दूर फेकले व तिने स्वतःला मृत्यूच्या हवाली करून पिल्लाला वाचविले. (फोटो सौजन्य- लोकसत्ता टीम)

लोकसत्ता टीम

नागपूर: समृद्धी महामार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत मुक जीवांचा अपघात होणे ही काही नवीन बाब नाही. माणसांकरिता हा महामार्ग वेळेची बचत करणारा असला तरी वन्य प्राण्यांसाठी मात्र कर्दनकाळ ठरला आहे. महामार्ग सुरू झाल्यापासून अनेक वन्य प्राण्यांचे मार्ग विस्कळीत झाल्यामुळे ते थेट महामार्गावरच भ्रमंती करताना दिसून येतात अशातच बरेचदा भरधाव वाहनाच्या धडकेत या मुक जीवांना आपला जीव गमवावा लागत आहे. रविवारी सकाळी वानराचा कळप महामार्ग ओलांडत असताना भरधाव वाहनाच्या रूपात मृत्यू डोळ्यासमोर पाहताच एक मादी वानराने आपल्या पिल्लाला स्वतः पासून दूर फेकले व तिने स्वतःला मृत्यूच्या हवाली करून पिल्लाला वाचविले.

आणखी वाचा- चंद्रपूर : विहिरीत पडून मादी बिबट्याचा मृत्यू

त्याचवेळी ओडिसावरून नाशिकला जाणारी रुग्णवाहिका व त्यातील कर्मचारी सकाळच्या सुमारास वर्धा टोलनाक्यावर थांबले. त्यांच्या देखत अचानक ही हृदय पिटाळून टाकणारी घटना घडली. हे बघताच रुग्णवाहिका चालक किशोर सूर्यवंशी व विक्की पठाण यांनी पथकर कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला व मादी वनर व तिच्या पिल्लाला वाचविण्याकरिता धाव घेतली. त्यांनतर त्यांनी तेथून तीन किमी अंतरावर असलेल्या करुणाश्रमामध्ये सदर जखमी वानर व तिच्या पिल्लाला दाखल केले. उपचारादरम्यान माकडाचा तर मृत्यू झाला पण तिचे पिल्लू मात्र सुखरूप वाचले. मृत्यूच्या दारात निपचित पडलेल्या आईला उठविण्याचा पिल्लू केविलवाणा प्रयत्न करीत होते. सध्या पिल्लाचा सांभाळ करुणाश्रमातील चमू करीत आहे. सदर रुग्णवाहिका ओडीसा येथे शव पोहोचविण्याकरिता गेली होती परंतु परतीच्या प्रवासात एका मुक्या प्राण्याला जीवनदान देऊन गेली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-04-2023 at 16:28 IST

संबंधित बातम्या