बुलढाणा : लग्न मंडपात भरधाव ऑटोरिक्षा शिरल्याने एका वऱ्हाड्याचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला. खामगाव शहरातील सजनपुरी परिसरात घडलेल्या या विचित्र दुर्घटनेमुळे आजही तणावाचं वातावरण कायम आहे. दंगल नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परिसराला छावणीचं स्वरूप आलं आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रासह देशभरात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी; पाहा कोणत्या जिल्ह्यात मुसळधार…




काल मंगळवारी ३० मेच्या रात्री उशिरा लग्न सोहळा सुरू होता. दरम्यान, अचानक लग्न मंडपात भरधाव ऑटोरिक्षा शिरला. या घटनेत दोन वऱ्हाडी जखमी झाले. यातील एका गंभीर जखमीवर सुरुवातीला खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले. नंतर त्याला अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात नेत असतानाच जखमीचा मृत्यू झाला. ऑटोरिक्षा चालक भिन्नधर्मीय आणि वऱ्हाड्याचा मृत्यू झाल्याने सजनपुरी परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करीत परिसरात दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.