नागपूर : पेट्रोल, डिझेलसह इतरही इंधनाच्या सातत्याने वाढणाऱ्या दरवाढीने सर्वसामान्यांचे जगणेच कठीण होऊन बसले असताना आता शहरातील काही पेट्रोलपंप चालकांनी पन्नास रुपयांहून कमी किमतीचे पेट्रोल न विकण्याचे फलक लावले आहेत. याबाबतचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्याने हे अधिकार पंपचालकांना आहेत काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. विद्यार्थ्यांसह कमी उत्पन्न असलेल्या बऱ्याच कामगारांकडून २० ते ४० रुपयांपर्यंत किमतीचे पेट्रोल भरले जाते. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलसह इतरही इंधनाचे दर भडकले आहेत. त्यामुळे उपराजधानीत बुधवारी साध्या पेट्रोलचे दर १२०.१६ रुपये नोंदवले गेले. पेट्रोलचे दर वाढल्याने कमी  पेट्रोल वाहनात टाकल्यास  काही सेकंदात पेट्रोल वाहनात जाते. त्यामुळे  ग्राहकांचे पेट्रोलपंप चालकांसोबत वाद होतात. त्यावर पेट्रोलपंप चालकांनी परस्पर नियम धाब्यावर बसवून ५० रुपयाहून कमी किमतीचे पेट्रोल दिले जाणार नसल्याचे  फलकच लावले आहेत. हा प्रकार काही समाजिक कार्यकर्त्यांनी मोबाईलमध्ये कैद करत समाजमाध्यमांवर प्रसारित केला.