नागपूर : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने ‘पीएच.डी.’ उमेदवारांना आता नोंदणी दिनांकापासून पहिल्या दोन वर्षांसाठी ३१ हजार रुपये, घरभाडे, आकस्मिक खर्च दिला जाणार आहे. तर ‘यूपीएससी’ची पूर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचे मासिक विद्यावेतन दहा हजारांवरून तेरा हजार करण्यात आले आहे. सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय मंडळ नागपूर येथे ‘महाज्योती’च्या संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये हा ठराव घेण्यात आला. वित्त विभागाकडे यासंदर्भात अधिक निधीची मागणी करण्याचे संकेत यावेळी बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी दिले.बैठकीला ‘महाज्योती’चे अध्यक्ष अतुल सावे, व्यवस्थापकीय संचालक प्रदीपकुमार डांगे, समाज कल्याणचे प्रादेशिक उपआयुक्त सिद्धार्थ गायकवाड, अविनाश गंधेवार, लेखा अधिकारी अतुल वासनिक उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी ‘पीएच.डी.’ सोबतच एम.फिल. उमेदवारांना एम.फिल. ते ‘पीएच.डी.’ असे एकत्रित लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. या संदर्भात ‘बार्टी’ पुणेच्या तज्ज्ञ समितीने दिलेल्या शिफारशीवर चर्चा करण्यात आली. उमेदवारांना ३१ हजार रुपये, ‘एचआरए’ आणि आकस्मिक खर्च देण्याबाबतही निर्णय घेण्यात आला. याशिवाय ‘यूपीएससी’साठी नवी दिल्ली येथे पूर्वतयारी करणाऱ्या उमेदवारांना मासिक विद्यावेतन १० हजारांवरून १३ हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच आकस्मिक खर्च एक वेळा १८ हजार रुपये अनुज्ञेय करण्यात आला आहे. ‘एमपीएससी’ राज्य मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मुलाखतीस पात्र उमेदवारांना २५ हजार एकवेळ अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. व्यावसायिक वैमानिक प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या वीस उमेदवारांना दहा हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला आहे.

हेही वाचा : नागपूर शहरात हुक्का पार्लरने पुन्हा धरला जोर ; तरुणाईला अमली पदार्थांचा विळखा

वित्त विभागाकडून मोठ्या प्रमाणात यासाठी निधी उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याचेही मंत्र्यांनी यावेळी सांगितले. सर्व जिल्ह्यांमध्ये महाज्योतीचे वसतिगृह सुरू करण्याबाबत गंभीरतेने या बैठकीत चर्चा झाली. याशिवाय सारथी, बार्टी व महाज्योती या तीनही विभागाचा उत्तम समन्वय ठेवण्याचे निर्धारित करण्यात आले.बैठकीपूर्वी सकाळी महाराष्ट्राच्या विविध भागातील ‘पीएच.डी.’च्या विद्यार्थ्यांनी आपल्या विविध मागण्या मंत्र्यांना सादर केल्या. यावेळी आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.

हेही वाचा : गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर महाराष्ट्राचा वाघ गुजरातला जाणार : सुधीर मुनगंटीवार

पीएच.डी. शिष्यवृतीच्या विद्यार्थी संख्येत वाढ करणे, एम.फिल. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना संलग्नित अधिछात्रवृत्ती द्यावी, बार्टी संस्थेप्रमाणे विद्यापीठाच्या नोंदणी दिनांकापासून एम.फील. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना पाच वर्षे अधिछात्रवृत्ती द्यावी अशा विविध मागण्यांसाठी अतुल सावे यांना निवेदन दिले.विद्यार्थ्यांनी केलेल्या मागण्यांना व नाविन्यपूर्ण सूचनांना निश्चितच गंभीरतेने घेण्यात येईल, असे यावेळी सावे यांनी स्पष्ट केले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Phd upsc students increase tuition fee mahajyoti board of directors meeting nagpur news tmb 01
First published on: 27-09-2022 at 10:15 IST