|| महेश बोकडे
पंतप्रधानांच्या छायाचित्रावर मात्र टीका

नागपूर : करोना प्रतिबंधात्मक लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्रावरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली. परंतु त्याचवेळी राज्यात ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित असलेल्या महापारेषण कंपनीने  दिलेल्या २०० लसीकरण वाहनांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या छायाचित्रांनी रंगवण्यात आले.

‘आपण स्वत:ला भाग्यवान समजले पाहिजे की, आपल्या वाहन परवान्यावर स्वत:चाच फोटो आहे, अशा शब्दात  काँग्रेस नेते व ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची मुलगी दीक्षा राऊत यांनी ‘ट्विटर’वरून पंतप्रधानांच्या छायाचित्राबाबत टीका केली होती. आता त्यांचे वडील ज्या खात्याचे मंत्री आहेत त्या ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारितील  महापारेषणने  सामाजिक दायित्व निधीतून  २०० लसीकरण वाहने दिली. या वाहनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे छायाचित्र  आहे. याबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी सलग दोन दिवस भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. विशेष म्हणजे, लसीकरण प्रमाणपत्रावर मोदी यांचे छायाचित्र असल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेनेही केंद्र सरकारवर टीका केली होती. आता या सर्व पक्षांच्या नेत्यांची छायाचित्रे या वाहनांवर असल्याने नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

आक्षेपार्ह काहीच नाही

‘‘ जगातील कोणत्याही पंतप्रधानांनी लस प्रमाणपत्रावर स्वत:चे छायाचित्र वापरले नाही. दुसरीकडे कोणतेही राज्य शासन असो तेथे शासकीय कार्यक्रमात शासकीय छायाचित्र वापरले जातात. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचेही छायाचित्र वापरले गेले. त्यानुसार लसीकरण वाहनांवरील छायाचित्र योग्य असून त्यात आक्षेपार्ह काहीच नाही.’’ – सचिन सावंत, प्रवक्ता, काँग्रेस.

…हा तर छुपा प्रचार

‘‘झटपट लसीकरणासाठी शासनाने आधी वाहने घेणे आवश्यक होते. परंतु निष्क्रिय सरकारने साठ टक्के लसीकरण पूर्ण झाल्यावर  वाहने आणून नुसता देखावा निर्माण केला. हे सरकार स्थानिक  स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यापुढे ठेवून छुप्या प्रचारासाठी लसीकरण वाहनांवर  मुख्यमंत्र्यांपासून ऊर्जामंत्र्यांपर्यंतचे छायाचित्र वापरत आहे. ते चुकीचे आहे.’’ – आमदार गिरीश व्यास, प्रवक्ता, भाजप.