नाव नोंदणीसाठी ३० नोव्हेंबपर्यंत विशेष मोहीम

नागपूर : मतदार यादीमध्ये छायाचित्रे नसलेली १ लाख ४२ हजार मतदारांची नावे यापूर्वी वगळण्यात आली आहेत. यादीमध्ये नाव असलेल्या व्यक्तीलाच आगामी निवडणुकांमध्ये मतदान करता येईल. त्यामुळे आपले नाव मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करावी, १८ वर्षांवरील ज्या व्यक्तींनी अद्याप मतदार यादीत नाव नोंदवलेले नाही, त्यांनी ३० नोव्हेंबपर्यंत आपले नाव ऑफलाईन अथवा ऑनलाईन स्वरूपात नोंदवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विमला आर. यांनी  केले.

दरम्यान, विभागीय आयुक्त व मतदार यादी निरीक्षक प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी मतदार यादीच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी  जिल्हाधिकारी विमला आर. उपायुक्त आशा पठाण, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर, तहसीलदार राहुल सारंग यांच्यासह लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य यांचे प्रतिनिधी व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

१ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे, मृत व्यक्तींची नावे तसेच दुबार मतदारांची नावे वगळणे, स्थानांतर करणे, नावात दुरुस्ती करण्याची संधी या मोहिमेमुळे मिळणार आहे. प्रशासनामार्फत याविषयी व्यापक जनजागृती केली जात आहेच. राजकीय पक्षांनी सुद्धा मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींची नेमणूक करून ही माहिती नागरिकांपर्यंत पोहचवून सहकार्य करावे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने करता येणार असून याबाबत काही अडचणी असल्यास हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन लवंगारे-वर्मा यांनी केले.

‘कॅम्पस अ‍ॅम्बेसिडर’

महाविद्यालय, विद्यापीठातील युवकांच्या मतदार नोंदणीसाठी ‘कॅम्पस अॅम्बेसिडर’ नियुक्त करण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून नोंदणी करण्याचे प्रयत्न करावेत. प्रसारमाध्यमे, समाज माध्यमांच्या माध्यमातून युवकांपर्यंत याविषयी माहिती पोहचवावी, असे लवंगारे-वर्मा म्हणाल्या.

अडचणी असल्यास येथे संपर्क साधा

दरम्यान, मतदार नोंदणी करताना अडचणी  येत असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ९४२३३१७२९५ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे जिल्हाधिकारी विमला आर. यांनी यावेळी सांगितले.