चंद्रपूर : चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत काँग्रेस व भाजपाची युती आहे. येथे काँग्रेसचे गंगाधर वैद्य सभापती तर भाजपाचे गोविंदा पोडे उपसभापती आहे. सभापती व उपसभापतींनी स्वपक्षीय नेत्यांना खूष करण्यासाठी बाजार समितीच्या कार्यालयातच स्वत:च्या खुर्चीमागे काँग्रेस नेते तथा राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार तथा भाजपा नेते व राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार या दोघांचे फोटो एकाच भिंतीवर आजूबाजूला लावले आहे. एकमेकांच्या विरोधात दंड थोपटणाऱ्या या नेत्यांच्या फोटोची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
काँग्रेसचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष तथा राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे कट्टर समर्थक प्रकाश देवतळे व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे कट्टर समर्थक तथा भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी हातमिळवणी करित चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लढली होती. काँग्रेस – भाजपा युतीच्या विरोधात काँग्रेसचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांचे पॅनल रिंगणात होते. धानोरकर यांच्या पॅनलचा पराभव करित देवतळे – भोंगळे पॅनलचा बाजार समिती निवडणुकीत विजय झाला होता. सभापती व उपसभापती पदाच्या निवडणुकीतदेखील देवतळे- भोंगळे पॅनलचे अनुक्रमे गंगाधर वैद्य व गोविंदा पोडे विजयी झाले. बाजार समितीत काँग्रेस-भाजपा अभद्र युतीची सत्ता असली तरी ही युती राज्यात इतकी गाजली की काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देवतळे यांची जिल्हाध्यक्ष पदावरून तत्काळ उचलबांगडी केली होती. त्यानंतर काही महिन्यांत भोंगळे यांचेही जिल्हाध्यक्ष पदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांना या पदापासून दूर करण्यात आले.




हेही वाचा – नागपूर आणि वर्धा या दोन जिल्ह्यांत १७ महिन्यांत १० हजार कृषीपंपांना वीज जोडणी
दरम्यान या अभद्र युतीमुळे काँग्रेस, भाजपाच्या जिल्हाध्यक्षांना पद सोडावे लागले असले तरी अजूनही बाजार समितीत ही युती कायम आहे. विशेष म्हणजे सभापती व उपसभापतींनी त्यांचे नेते राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तथा राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे छायाचित्र कार्यालयात एकाच भिंतीवर आजूबाजूला लावले आहे. एकमेकांच्या विरोधात नेहमीच दंड थोपटणाऱ्या या दोन्ही नेत्यांची छायाचित्रे एकाच भिंतीवर बघून राजकीय वर्तुळात या छुप्या युतीची चांगलीच चर्चा रंगली आहे. बाजार समिती कार्यालयात सभापती व उपसभापतींच्या खुर्चीच्या मागेच हे छायाचित्र लागले आहे. त्यामुळे बाजार समितीत येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकालाच हे दोन्ही फोटो दिसतात आणि जिल्ह्यातील अभद्र युतीच्या राजकारणाचा विषय चर्चेत येतो.