अमरावती :  शहरातील राजापेठ परिसरातील खासगी रुग्णालयात कार्यरत एका ३८ वर्षीय फिजीओथेरपिस्टने दोन दिवसांपुर्वीच रुजू झालेल्या शिकाऊ परिचारिका तरुणीचा विनयभंग केल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. या प्रकरणी पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन राजापेठ पोलिसांनी या फिजीओथेरपिस्टला तत्काळ अटक केली आहे. आशीष त्र्यंबकराव चौधरी (३८, रा. विश्राम नगर, साईनगर, अमरावती) असे पोलिसांनी अटक केलेल्या फिजीओथेरपिस्टचे नाव आहे. २१ वर्षीय पीडित तरूणी दोन दिवसांपुर्वीच या खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून रुजू झाली होती. मंगळवारी दुपारी आरोपी आशिष चौधरी याने पीडित तरूणीला फिजीओथेरपी शिकवतो, असे सांगितले. त्यानंतर त्याने या तरुणीला शिकवण्याला सुरूवात केली. मात्र फिजीओथेरपीचे धडे देत असतानाच आरोपीने पीडित तरुणीसोबत असभ्य वर्तन सुरू केले. आशिष चौधरीने चालवलेल्या प्रकारामुळे तरूणीला जबर धक्का बसला. या प्रकरणी पीडित तरूणीने तत्काळ राजापेठ पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांना हा घटनाक्रम सांगितला. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी रुग्णालय गाठले व आशीष चौधरीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पीडितेने दिलेल्या तक्रारीवरुन फिजीओथेरपिस्ट आशिष चौधरीविरुध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे. अशी माहिती राजापेठ पोलिसांनी दिली आहे. या घटनेने शहरातील वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.