scorecardresearch

शहरातील रस्त्यांवर बांधकाम साहित्याचे ढिगारे; अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा

”सार्वजनिक ठिकाणी टाकलेले बांधकाम साहित्य उचलले नाही तर दंडात्मक कारवाई करण्याच्या इशारा महानगरपालिकेकडून देण्यात आला आहे.

शहरातील रस्त्यांवर बांधकाम साहित्याचे ढिगारे; अनेक ठिकाणी वाहतुकीला अडथळा
नागूपर शहरातील रस्त्यांवर बांधकाम साहित्याचे ढिगारे

नागपूर : शहर स्वच्छ, सुंदर दिसावे म्हणून एकीकडे महापालिका वेगवेगळे उपक्रम राबवत असतानाच दुसरीकडे मात्र इमारत बांधकामासाठी लागणारे साहित्य तसेच जुन्या इमारती पाडून त्याचा निघालेला मलबा रस्त्यावर टाकला जात आहे.

हेही वाचा- वाशिम : शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी जिल्ह्यातून ५० ‘एसटी बसेस’ जाणार , प्रवाशांना मात्र मन:स्ताप

या साहित्यावर प्रक्रिया करण्यासाठी भांडेवाडी येथे महापालिकेने सुरू केलेले केंद्र सहा महिन्यांपासून बंद आहे. सध्या अनेक भागात अतिक्रमण विभागाकडून अवैध बांधकामावर कारवाई केली जात आहे. काही भागात जुनी घरे पाडून नव्याने इमारती बांधण्याचे काम सुरू आहे. जुन्या इमारतीचा मलबा आणि नव्या इमारतीसाठी लागणारे बांधकाम साहित्य सर्रास रस्त्यावर टाकले जात आहे. रस्त्यावरील विटा, वाळू, गिट्टीच्या ढिगाऱ्यांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. इतवारी, महाल, सक्करदरा, सदर, मंगळवारी, गोकुळपेठ, धरमपेठ, सतरंजीपुरा, लकडगंज, चिंचभवन भागातील रस्त्यांवर बांधकाम साहित्य पडून आहे. केळीबाग मार्गावरील बडकस चौक परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी मोठ्या इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. त्यांचा मलबा तेथेच पडून आहे. त्यामुळे ऐन नवरात्रीत या भागात वाहतूक विस्कळीत झाली आहे.

हेही वाचा- वर्धा मार्गावरील डबलडेकर उड्डाण पुलांवरील फलक ठरतायत धोकादायक; तातडीने हटवण्याची मागणी

असाच प्रकार चिंचभवनमध्येही सुरू आहे. येथे मुळातच रस्ते अरुंद आहेत. त्यावर लोकांनी बांधकाम साहित्य टाकले. अनेक ठिकाणी अवैध बांधकाम सुरू आहेत. त्याचे साहित्य रस्त्यावर टाकण्यात आले आहे. महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने डोळे बंद करून ठेवले आहेत.

माजी नगरसेवकांची दुहेरी भूमिका

नागरी सुविधांबाबत तक्रारी करण्यासाठी नागरिक माजी नगरसेवकांकडे गेल्यास त्यांना प्रशासकाकडे तक्रार करा, असे सांगितले जाते. मात्र बांधकाम साहित्य रस्त्यावर टाकणाऱ्यांवर कारवाई करायला गेलेल्या पथकाला हेच माजी नगरसेवक रोखतात, अशा तक्रारी आहेत.

हेही वाचा- दूषित पाणी प्यायल्याने गावकऱ्यांना अतिसाराची लागण; १०० पेक्षा अधिक बाधित

”सार्वजनिक ठिकाणी बांधकाम साहित्य टाकल्यास दंडात्मक कारवाई केली जाते. अनधिकृत इमारती पाडल्यानंतर तयार होणारा मलबा संबंधित इमारत मालकांनी उचलायला हवा. मात्र तसे होत नसेल तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल.”, अशी माहिती महापालिकेचे आरोग्य विभाग (घनकचरा) अधिकारी गजेंद्र महल्ले यांनी दिली.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या