|| महेश बोकडे

बढतीसाठी आता बी. एस्सी. कसे करणार?

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागात आरोग्य कर्मचारी म्हणून २० ते २५ वर्षे सेवा दिलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा घाट रचला जात असल्याचा आरोप होत आहे. सेवा नियमात बदल करून आरोग्य सहाय्यकासाठी बी. एस्सी.ची अट टाकली गेली आहे. पूर्वी दहावीच्या निकषावर आरोग्य कर्मचारी म्हणून नियुक्ती होत होती. त्यामुळे पदोन्नतीसाठी या कर्मचाऱ्यांनी आता बी. एस्सी.ची डिग्री कुठून आणावी, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. या निर्णयाचा राज्यातील सुमारे दीड ते दोन हजार कर्मचाऱ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडे राज्यात सुमारे ६ हजार आरोग्य कर्मचारी आणि तीन हजारांच्या जवळपास आरोग्य सहाय्यक आहेत. पूर्वी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी दहावी उत्तीर्ण असा निकष होता. या आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतून आरोग्य सहाय्यक पदावर बढती मिळायची. आता संचालक आरोग्य सेवा आयुक्तालय, पुणे कार्यालयाने यावर्षी पदोन्नतीची प्रक्रिया ३० सप्टेंबर २०२१ पूर्वी पूर्ण करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप) नागपूर यांनी १२० आरोग्य कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव विभागीय पदोन्नतीचे अध्यक्ष उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर यांना पाठवला. तेथे पदोन्नतीला मंजुरीही मिळाली. राज्यातील इतरही भागात कमी-अधिक अशीच प्रक्रिया झाली. परंतु पदोन्नतीचे आदेश निघाले नाही.

दरम्यान, २९ सप्टेंबरला शासनाने बदललेल्या सेवा प्रवेशाच्या नियमावर बोट ठेवले. नवीन सेवा प्रवेशाच्या नियमानुसार, आरोग्य सहाय्यक पदासाठी आता बी. एस्सी. ची अट ठेवण्यात आली आहे. परंतु पदोन्नती जुन्याच कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याने त्यांना जुना नियम लागू करणे अपेक्षित होते. त्यातच आरोग्य विभागाकडून आरोग्य सहाय्यकाची सुमारे ७५ टक्के पदे पदोन्नतीने तर २५ टक्के पदे भरती प्रक्रियेतून भरली जाणार असल्याचे सांगण्यात येते. नवीन पदभरतीला बी. एस्सी.ची अट योग्य असली तरी पदोन्नतीसाठी आता दहावीच्या निकषावर नोकरी लागलेल्यांनी बी. एस्सी.ची डिग्री कुठून आणावी हा प्रश्न कर्मचारी विचारत आहे. या विषयावर आरोग्य संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलणे टाळले.

‘‘आरोग्य कर्मचारी म्हणून २० ते २५ वर्षे  सेवा दिल्यावर पदोन्नतीतून आरोग्य सहाय्यकपदी बढती मिळत होती. परंतु सेवा प्रवेश नियमांच्या आधारावर नागपूर विभागात १२० तर इतरत्रही मोठ्या संख्येने आरोग्य कर्मचाऱ्यांची पदोन्नती अडकून पडली आहे. नवीन भरती बी. एस्सी.च्या निकषांवर करण्यास हरकत नाही. परंतु दहावीच्या निकषावर लागलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी जुनेच नियम लावावे. या विषयावर नागपुरात आंदोलन सुरू केले आहे.’’ – पंकज उल्लीपवार, आरोग्य कर्मचारी ते आरोग्य सहाय्यक  पदोन्नती पात्र कर्मचारी कृती समिती.

‘‘नवीन सेवा नियमामुळे जुन्या सेवा नियमातील कर्मचारी  पदोन्नतीच्या प्रक्रियेतून बाद झाल्याचे वरिष्ठांकडून मागवलेल्या मार्गदर्शनात स्पष्ट झाले. नवीन बी. एस्सी.च्या अटीमुळे नागपूर विभागातील १ वा २ कर्मचारीच पात्र ठरू शकतात. त्यामुळे पुन्हा वरिष्ठांकडून दिशानिर्देश मागवून त्यांच्या सूचनेनुसारच प्रक्रिया केली जाईल.’’ – डॉ. श्याम निमगडे, सहाय्यक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप), नागपूर.