गडचिरोली : तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमावर्ती भागात सक्रिय असलेल्या नक्षलवादी चळवळीला सोमवारी मोठा हादरा बसला. नक्षल्यांच्या ‘पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी’चा (पीएलजीए) प्रमुख कमांडर सोडी केशालू याने आपल्या ४० सहकाऱ्यांसह तेलंगणा पोलिसांसमोर शस्त्रे खाली ठेवून शरणागती पत्करली.
‘मल्ला’ या टोपणनावाने ओळखला जाणारा केशालू हा बस्तरमधील नक्षलवादी संघटनेच्या वरिष्ठ फळीतील महत्त्वाचा नेता मानला जातो. तेलंगणा-छत्तीसगड सीमावर्ती भागात कार्यरत असलेल्या माओवादी बटालियनमध्ये तो उप-कमांडर म्हणून कार्यरत होता. यापूर्वी शरण आलेल्या जहाल नक्षल नेता बारसे देवा याच्यानंतर, केशालू हाच संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा प्रभावी नेता असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.
शस्त्रे त्यागून मुख्य प्रवाहात सामील झालेल्या या गटामध्ये विभागीय समिती सदस्य, क्षेत्र समिती नेते आणि प्लाटून स्तरावरील नक्षल सदस्यांचा समावेश आहे. शरणागतीवेळी या नक्षल सदस्यांनी एके-४७, इन्सास आणि एसएलआर यांसारखी आधुनिक स्वयंचलित शस्त्रे पोलिसांकडे सुपूर्द केली. वयाची चाळीशी ओलांडलेला केशालू कार्रेगुट्टा टेकड्यांच्या दुर्गम परिसरात २० ते ३० नक्षल सदस्यांच्या तुकडीचे नेतृत्व करत होता. तेलंगणा पोलिसांनी बक्षिसाच्या रकमेबाबत अधिकृत घोषणा केली नसली तरी, केशालूवर सुमारे २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर असण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
शरणागती पत्करण्याची मालिका सुरूच
या वर्षात तेलंगणा राज्यात प्रमुख नक्षलवादी कमांडरनी शरणागती पत्करण्याची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे. वर्षाच्या सुरुवातीला २ जानेवारी रोजी पीएलजीए ‘बटालियन-१’ चा कमांडर बारसा देवा ऊर्फ देवन्ना याने शरणागती पत्करली होती. त्यानंतर २२ फेब्रुवारी रोजी नक्षलवादी चळवळीत ४० वर्षे घालवलेला आणि ‘पॉलिटब्युरो’चा सर्वोच्च सदस्य असलेला ६२ वर्षीय थिप्पिरी तिरुपती ऊर्फ देवजी याने पोलीस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांच्यासमोर शस्त्रे ठेवली. यावेळी त्याच्यासोबत वरिष्ठ नेता मल्ला राजी रेड्डी आणि महत्वाचे नक्षल सदस्य उपस्थित होते.
नक्षल चळवळीला ओहोटी
त्यानंतर ७ मार्च रोजी हैदराबादमध्ये १३० नक्षल सदस्यांनी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत सामूहिकरीत्या शरणागती पत्करली आणि १२४ शस्त्रे पोलिसांच्या स्वाधीन केली. या मोठ्या शरणागतीनंतर, तेलंगणा राज्य समितीचे अस्तित्व आता पूर्णपणे संपुष्टात आल्याचे पोलिसांकडून जाहीर करण्यात आले आहे. पोलिसांचा वाढता दबाव आणि विकासाच्या मुख्य प्रवाहाकडे वळलेला कल यामुळे नक्षल चळवळीला ओहोटी लागल्याचे चित्र सध्या सीमेवर दिसत आहे.
