नागपूरः नागपूरसह मध्य भारतात गंभीररित्या जळालेल्या रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेली त्वचा पेढी उपलब्ध नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.

भारतासह जगभरात सध्या जळालेल्या रुग्णांवर उपचारासाठी नवनवीन तंत्र विकसित होत आहेत. त्यापैकी एका तंत्रानुसार, कमी प्रमाणात जळालेल्या रुग्णाच्या जखमेवर त्याच्या शरीराच्या इतर भागातील त्वचा काढून लावली जाते. रुग्णाची स्वत:ची त्वचा उपलब्ध नसल्यास त्वचा पेढीतून त्वचा मिळवली जाते. अशी त्वचा लावल्याने संक्रमणाची शक्यता कमी होते. सुमारे १४ दिवसांनंतर हळूहळू ही त्वचा रुग्णाच्या शरीराद्वारे नाकारली जाते. त्यानंतर इतर उपचार केले जातात.

दिल्ली, मुंबई, पुण्यात त्वचा पेढीमुळे मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे. दरम्यान, नागपुरात दोन शासकीय व दोन खासगी वैद्यकीय महाविद्यालयांसह अनेक मोठी खासगी रुग्णालये आहेत. परंतु येथे एकही त्वचा पेढी नाही. बाजारगावच्या सोलार एक्सप्लोसिव्ह आणि धामनातील चामुंडी कंपनीत झालेल्या स्फोटात १७ हून अधिक बळी गेले. यापैकी काहींचा उपचारादरम्यान संक्रमणाने मृत्यू झाला. नागपुरात त्वचा पेढी असती तर या जखमींना वाचवता येऊ शकले असते.

आणखी वाचा-‘एमपीएससी’ उत्तीर्ण होऊनही नियुक्तीची प्रतीक्षा; अकरा महिन्यांपासून ‘कृषी’चे विद्यार्थी प्रतीक्षेतच

मेडिकलमधील प्रस्ताव बारगळला

रोटरी क्लब, ऑरेंजसिटी रुग्णालय, नॅशनल बर्म सेंटर (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने नागपुरातील पहिली त्वचा पेढी ऑरेंज सिटी रुग्णालयात २०१४ मध्ये सुरू झाली होती. ही देशातील चौथी त्वचा पेढी होती. परंतु त्वचा दाते मिळत नसल्याने व खर्च परवडत नसल्याने ती बंद झाली. मेडिकल प्रशासनाने ही त्वचापेढी चालवण्याची तयारी दाखवल्यावर येथील यंत्र मेडिकलमध्ये पाठवण्यात आले. परंतु आर्थिक आणि इतर कारणांनी यंत्र पडूनच राहिले. मध्यंतरी तंत्रज्ञ बोलावून यंत्राची तपासणी केली असता ते कालबाह्य झाल्याचे पुढे आले. त्यामुळे येथील त्वचा पेढीचा प्रस्ताव बारगळला.

“नागपुरात त्वचा पेढी झाल्यास ती जळालेल्या रुग्णांसाठी वरदान ठरेल. शासनाने त्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यातून जळालेल्या रुग्णांचा मृत्यूदर कमी होऊ शकतो.” -डॉ. समीर जहागिरदार, अध्यक्ष, विदर्भ प्लास्टिक सर्जन असोसिएशन.

आणखी वाचा-लोकजागर: महायुतीचे काय चुकले

नागपुरात त्वचा पेढीचे महत्व काय?

विदर्भात शस्त्रांची निर्मिती करणाऱ्या काही आयुध निर्माणी आहेत. येथे लष्करी वापरासाठी बॉम्ब, अग्निबाण, बॉम्बचे कवच आणि अन्य शस्त्रे तयार होतात. याखेरीज चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली भागात मायनिंगचे प्रकल्प आहेत. खापा, उमरेड व इतर भागातही अनेक खाणी आहेत. अनेकदा खाणींमध्ये स्फोट होतात. या घटनेतील अनेक गंभीर जखमींच्या उपचारासाठी नागपूरच्या शासकीय अथवा खासगी रुग्णालयात हलवले जाते. त्यामुळे येथे त्वचा पेढी महत्वाची ठरू शकते.