महापौरांचे प्रतिपादन; खासदार सांस्कृतिक महोत्सव १७ ते २६  डिसेंबर दरम्यान

नागपूर : युवकांचा सर्वागीण विकास साधायचा असेल तर प्रत्येक राज्यामध्ये खासदार क्रीडा महोत्सवांचे आयोजन केले पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद मोदी यांनी संसदेत सर्व खासदारांना संबोधित करताना सांगितले. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी  पंतप्रधानांच्या या घोषणेआधी अशा क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करत आपल्या दूरदृष्टीचा परिचय दिला आहे, असे प्रतिपादन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.

नागपूरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा खासदार सांस्कृतिक महोत्सव दोन वर्षांनंतर १७ ते २६  डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात भूमिपूजन व कार्यालयाचे उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला माजी खासदार अजय संचेती, शहर अध्यक्ष प्रवीण दटके, आ. मोहन मते, आ. विकास कुंभारे, कृष्णा खोपडे यांच्यासह खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले, उपाध्यक्ष अशोक मानकर आदी समितीचे इतर सदस्य प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपुरातील कलाकारांना मोठा मंच मिळावा, हजारो लोकांच्यासमोर त्यांना आपली कला सादर करता यावी, या प्रतिभांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचावा, हा खासदार महोत्सवाचा उद्देश असून तो सफल झाला आहे. करोनाच्या नियमांचे पालन करून खासदार सांस्कृतिक महोत्सव होणार आहे.

आयोजन समितीचे अध्यक्ष प्रा. अनिल सोले यांनी महोत्सवाच्या आयोजनासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी विविध व्यवस्थासंबंधी माहिती देत प्रत्येक सदस्याला जबाबदारी देण्यात आल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन जयप्रकाश गुप्ता यांनी तर आभार प्रा. राजेश बागडी यांनी मानले.