यवतमाळ : जिल्ह्यात केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’ (पीएम किसान) योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल २ लाख ६ हजारहून अधिक पात्र शेतकऱ्यांनी अद्याप ‘ई-केवायसी’ प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. यामुळे या शेतकऱ्यांचा आगामी हप्ता रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाने दिलेल्या मुदतीनंतरही बहुतांश शेतकऱ्यांनी याकडे पाठ फिरवल्याने कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
मुदत उलटूनही शेतकरी फिरकले नाही
योजनेतील पारदर्शकता वाढवणे, बोगस लाभार्थ्यांना चाप लावणे आणि केवळ पात्र व जिवंत शेतकऱ्यांपर्यंतच थेट लाभ पोहोचवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार २० मे २०२६ पासून जिल्ह्यात ई-केवायसीसाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र, ३० जूनची अंतिम मुदत उलटून गेल्यानंतरही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ई-केवायसीकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. जिल्हाधिकारी विकास मीना व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी सर्व उर्वरित शेतकऱ्यांना विलंब न करता ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही.
केवळ ९७ हजार शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण
यवतमाळ जिल्ह्यात ‘पीएम किसान’ योजनेचे एकूण ३ लाख ४ हजार १०६ लाभार्थी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, त्यापैकी आतापर्यंत केवळ ९७ हजार २१८ लाभार्थ्यांनीच वार्षिक ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. उर्वरित २ लाख ६ हजार ८८८ लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. मुदत संपली असली तरी तांत्रिक कारणांमुळे हप्ता अडकू नये म्हणून प्रशासनाने ही प्रक्रिया सुरू ठेवली असून, शेतकऱ्यांनी सीएससी केंद्र किंवा स्वतःच्या मोबाईलवरून ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
सुविधा देऊनही शेतकरी दूरच
प्रशासनाने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण तसेच ‘फेस ऑथेंटिकेशन’ या दोन सोप्या पद्धती उपलब्ध करून दिल्या आहेत. जे शेतकरी वृद्ध, आजारी आहेत किंवा ज्यांना हालचाल करणे शक्य नाही, त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामस्तरीय नोडल अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी थेट शेतकऱ्यांच्या घरी जाऊन मोबाईल ॲपद्वारे ‘फेस ऑथेंटिकेशन’ करून ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण करत आहेत.
असे आहेत प्रलंबित शेतकरी
जिल्ह्यातील सोळाही तालुक्यांमध्ये ई-केवायसीचे मोठे काम प्रलंबित आहे. यामध्ये आर्णी तालुका (सक्रिय: २०,०१६, पूर्ण: ६,३४०, प्रलंबित: १३,६७६), बाभूळगाव (सक्रिय: १३,४३५, पूर्ण: ३,९३०, प्रलंबित: ९,५०५), दारव्हा (सक्रिय: २५,०५६, पूर्ण: ७,६०८, प्रलंबित: १७,४४८), दिग्रस (सक्रिय: १६,२५२, पूर्ण: ३,७५६, प्रलंबित: १२,४९६), घाटंजी (सक्रिय: १९,२००३, पूर्ण: ६,५७८, प्रलंबित: १२,६२५), कळंब (सक्रिय: १३,६५६, पूर्ण: ३,८५८, प्रलंबित: ९,७९८), केळापूर (सक्रिय: १६,२३१, पूर्ण: ४,१६४, प्रलंबित: १२,०६७), महागाव (सक्रिय: २५,१५९, पूर्ण: १०,४४८, प्रलंबित: १४,७११), मारेगाव (सक्रिय: १३,१६७, पूर्ण: ३,७८३, प्रलंबित: ९,३८४), नेर (सक्रिय: १८,७६२, पूर्ण: ५,९७४, प्रलंबित: १२,७८८), पुसद (सक्रिय: ३२,३५१, पूर्ण: ९,७०२, प्रलंबित: २२,६४९), राळेगाव (सक्रिय: १६,४५१, पूर्ण: ४,८८७, प्रलंबित: ११,५६४), उमरखेड (सक्रिय: २७,१७१, पूर्ण: १२,३४८, प्रलंबित: १४,८२३), वणी (सक्रिय: १८,६३५, पूर्ण: ५,३८०, प्रलंबित: १३,२५५), यवतमाळ (सक्रिय: १६,१५४, पूर्ण: ४,६००, प्रलंबित: ११,५५४) आणि झरी-जामणी तालुक्यात (सक्रिय: १२,४०७, पूर्ण: ३,३०३, प्रलंबित: ९,१०४) अशी स्थिती आहे. शेतकऱ्यांनी पीएम किसानचा आगामी हप्ता विनाअडथळा मिळवण्यासाठी जवळच्या महासेवा केंद्राशी संपर्क साधून किंवा स्वतः ‘पीएम किसान’ पोर्टलवरून ई-केवायसी तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
