नागपूर : इराण, अमेरिका – इस्त्रायल युद्धामुळे वैश्विक संकट निर्माण होण्याचा धोका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सोने खरेदी सोबतच परदेशी दौरेही टाळण्याचे आवाहन केले आहे. परंतु दुसरीकडे राज्यातील अधिकारी, पदाधिकारी मात्र परदेशी दौऱ्यावर आहेत. पाच अधिकारी,पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ आठ दिवस डेन्मार्कच्या दौर्‍यावर आहेत. यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय विश्वासू समजले जाणाऱ्या अधिकार्‍यांचाही समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आवाहन एक प्रकारे हवेत उडवल्याची टीका होत आहे.

इंधनासोबत अनेक साधन सामग्रीचा प्रश्न निर्माण होण्याचा धोका आहे. त्यामुळे इंधनचा काटकसरीने वापर करण्यासोबत सोनेही खरेदीवर वर्षभर संयम ठेवण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. परदेशी चलन वाजवण्यासाठी परदेशी दौरे व पर्यटनही टाळण्याचे आवाहन मोंदीनी केले आहे. यावर विरोधकांनी टीका केली आहे. परदेश नीतित सरकार चुकल्याचीही टीका होत आहे. तर दुसरीकडे काही नागरिकांकडून त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात येत आहे. अनेक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इंधन कपातीचा निर्णय घेतला आहे.

प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांकडूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद देण्यात येत असून काहींनी सार्वजनिक वाहतूक प्रणालीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. दौरे टाळून ऑनलाईन बैठकांवर भर देण्यात येत आहे. परदेशातील पर्यटनही टाळण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही काटकसरीच्या सूचना केल्यात. बैठकाही ऑनलाईन घेण्याचे स्पष्ट केले आहे. त्याच प्रमाणे इंधन कपातीसाठी दुचाकीचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश दौऱ्यांवर निर्बंध घालण्याचे स्पष्ट केले. परंतु दुसरीकडे सरकारी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे परदेशातील दौरे सुरूच आहे. त्यामुळे सरकारच्या जवळील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना यातून सूट देण्यात आली आहे का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

हे अधिकारी- पदाधिकारी जाणार डेन्मार्कला

डेन्मार्कला आयोजित या परदेशी दौऱ्यात मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार तथा मित्रा संस्थेचे सीईओ प्रवीण परदेशी यांच्या समावेश आहे. परदेशी हे मुख्यमंत्र्याचे अतिशय जवळचे अधिकारी समजले जातात. त्याच प्रमाणे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. एस. आर. नाईक, सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओम्बासे यांचा समावेश आहे. त्याच प्रमाणे सोलापूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती रंजिता चकोते व उमरेड नगर परिषदेच्या नगराध्यक्ष प्राजक्ता आदमाने यांचा यात समावेश आहे.

हा दौरा १६ ते २४ मे दरम्यन राहणार आहे. याबाबतचा आदेश नगर विकास विभागाचे उपसचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी १५ मे रोजी काढला. या दौऱ्याचा संपूर्ण खर्च हा रॉयल डेन्मार्क इम्बेसी, नवी दिल्ली मार्फत करण्यात येणार असल्याचे या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांच्या दौऱ्याचा कालावधी हा कर्तव्य कालावधी म्हणून गृहीत धरण्यात येणार आहे. ‘टेक्निकल अवेयरनेस विजिट ऑन क्लाइमेट-स्मार्ट वॉटर इन्फ्रास्ट्रक्चर’ या विषयावर अभ्यासासाठी हे अधिकारी,पदाधिकारी जात आहे.