वर्धा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या १३७ व्या पर्वात एका फळाची महती सांगितली. त्याची विविध उदाहरणे दिली.कधीकाळी दुर्लक्षित असलेलं असे हे फळ. शेतकरी नेहमीच पारंपरिक पिकांच्या चक्रात अडकलेला असतो. पण आता काळ बदलतोय. बाजारातील नव्या ट्रेंड्स आणि मागणीनुसार पीक घेणारा शेतकरी आता प्रगतीच्या नव्या वाटा चोखाळत आहे. अलीकडेच मोठ्या शहरांमध्ये एका खास परदेशी फळाची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. एकेकाळी भारतात कोणालाही माहिती नसलेल्या या फळाच्या वेडाने आता दक्षिण भारतातील अनेक शेतकऱ्यांचे नशीब पालटले आहे.

पंतप्रधान म्हणतात की …

खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी त्यांच्या मन की बात या रेडिओ कार्यक्रमाच्या १३७ व्या पर्वात या शेतकऱ्यांच्या यशाची गाथा मांडून शेतकऱ्यांना बक्कळ कमाईची एक ‘नवी रेसिपी’च जणू सांगितली आहे. पंतप्रधानांनी आवर्जून ज्या फळाचा उल्लेख केला, ते फळ म्हणजे ‘अ‍ॅव्होकॅडो’ (Avocado). काही वर्षांपूर्वीपर्यंत भारतात अ‍ॅव्होकॅडो या फळाविषयी फारशी कोणालाच माहिती नव्हती. त्याचे मूल्य आणि बाजारातील मागणीही अत्यंत कमी होती. मात्र, आरोग्याविषयी वाढलेल्या जागरूकतेमुळे आता हेच फळ हेल्थ आणि प्रीमियम मार्केटमध्ये लोकांची पहिली पसंती बनले आहे. घरातील डायनिंग टेबलपासून ते शहरातील मोठ्या रेस्टॉरंट्सपर्यंत ‘अ‍ॅव्होकॅडो टोस्ट’ची मागणी प्रचंड वाढली आहे. याच वाढत्या शहरी मागणीचे रूपांतर आता आपल्या कल्पक शेतकऱ्यांनी कमाईच्या एका नव्या ‘रेसिपी’मध्ये केले आहे. पंतप्रधान मोदींनी या फळाच्या लागवडीतून कशी प्रगती साधता येते, याची काही प्रेरणादायी उदाहरणे दिली.

काय आहे हे फळ?

ॲव्होकॅडो हे पोषकतत्त्वांनी समृद्ध फळ आहे. ज्याला ‘बटर फ्रूट’ म्हणूनही ओळखले जाते. इतर फळांच्या तुलनेत यात साखरेचे प्रमाण अत्यंत कमी आणि निरोगी स्निग्ध पदार्थांचे प्रमाण जास्त असते. निरोगी फॅट्स- यामध्ये मुख्यत्वे ‘मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स’ असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. फायबर – ॲव्होकॅडोमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

अन्य खजिना असा

व्हिटॅमिन्स व मिनरल्स – यात व्हिटॅमिन के ,सी,इ,बी-६ फोलेट आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. (केळ्यापेक्षाही जास्त पोटॅशियम ॲव्होकॅडोमध्ये आढळते.) हृदयाचे आरोग्य – वाईट कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यास हे फळ मदत करते. कमी ग्लायसेमिक इंडेक्समुळे मधुमेही व्यक्तींसाठी अत्यंत उपयुक्त म्हटल्या जाते. ल्युटीन आणि झिॲक्सॅन्थिन मुळे दृष्टी सुधारते. व्हिटॅमिन ई मुळे त्वचा मऊ आणि चमकदार राहते.

वापर कसा करावा

ॲव्होकॅडो कापून सॅलडमध्ये किंवा ब्रेड टोस्टवर मॅश करून खाल्ले जाते. दुध किंवा इतर फळांसोबत मिक्सरमध्ये फिरवून पौष्टिक स्मूदी बनवता येते. ग्वाकामोल ही एक लोकप्रिय मेक्सिकन डिश आहे, ज्यामध्ये मॅश केलेल्या ॲव्होकॅडोमध्ये कांदा, टोमॅटो, लिंबू आणि कोथिंबीर मिसळली जाते. आता लहान शहरात पण हे फळ सहज उपलब्ध होवू लागले आहे. तोच धागा पंतप्रधान मोदी यांनी टिपल्याचे दिसून येते.