नागपूर : केंद्र सरकारच्या ‘पी.एम. सूर्यघर मोफत वीज योजने’तील लाभार्थ्यांची संख्या लवकरच ५ लाखांचा टप्पा गाठणार आहे. सर्वाधिक लाभार्थी असलेल्या पहिल्या दहा जिल्ह्यांमध्ये नागपूरसह विदर्भातील तीन जिल्ह्यांचा समावेश आहे. या उपक्रमामुळे राज्याची वीज निर्मिती क्षमता १ हजार ७०० मेगावॉटने वाढली आहे. या योजनेबाबत आपण आणखी जाणून घेऊ या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून ‘पी.एम. सूर्यघर’कडे बघितले जाते. योजनेचा मुख्य उद्देश घरांमध्ये छतावर सोलर (सौर) पॅनेल लावताना त्यासाठी वित्तीय मदत (सब्सिडी) देणे आणि परिणामी घरांना प्रतिमहिना ३०० युनिटपर्यंत मोफत वीज मिळणे हा आहे. योजनेअंतर्गत ग्राहकाला १ किलोवॉटसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॉटसाठी ६० हजार आणि ३ किलोवॉटपर्यंत ७८ हजार रुपये अनुदान दिले जाते. अनुदानासाठी कमाल मर्यादा ३ किलोवाॅटची असून त्याहून अधिकचा प्रकल्प लावणाऱ्यालाही तीन किलोवाॅट एवढेच (७८ हजार) अनुदान दिले जाते.

दरम्यान राज्यात १२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत योजनेअंतर्गत ४ लाख ४७ हजार ८८४ घरांच्या छतावर रुफटाॅफ (सौर ऊर्जा पॅनल) प्रकल्प कार्यान्वित झाले. त्याची वीज निर्मिती क्षमता १ हजार ७०० मेगावाॅट आहे. योजनेअंतर्गत सर्वाधिक ६५ हजार २११ लाभार्थी नागपूर जिल्ह्यातील आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यात ३१ हजार ४८८ लाभार्थी, जळगावमध्ये ३० हजार ७८० लाभार्थी, छत्रपती संभाजीनगरमध्ये ३० हजार ७६३ लाभार्थी, अमरावती जिल्ह्यात २६ हजार ८५९ लाभार्थी, नाशिक जिल्ह्यात २६ हजार ७०२ लाभार्थी, कोल्हापूरला १९ हजार ६६ लाभार्थी, सोलापूरला १६ हजार ३ लाभार्थी, अहिल्ह्यानंतरमध्ये १५ हजार ९०० लाभार्थी, बुलढाणा जिल्ह्यात १५ हजार २० लाभार्थींनी योजनेचा लाभ घेतला आहे. या आकडेवारीला महावितरणचे उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटणकर यांनी दुजोरा दिला आहे.

पी.एम. सूर्यघर योजनेची स्थिती (१२ फेब्रुवारी २०२६ पर्यंत)

क्र.जिल्हालाभार्थी संख्यावीज क्षमता (मेगावॅट)
1नागपूर65,211252.21
2पुणे31,488146.89
3जळगाव30,780114.10
4छ. संभाजीनगर30,763107.30
5अमरावती26,859107.22
6नाशिक26,70295.71
7कोल्हापूर19,06687.89
8सोलापूर16,00354.54
9अहिल्यानगर15,90053.47
10बुलढाणा15,02054.05