नागपूर : घराच्या छतावर सौर प्रकल्प उभारून वीजबिलाचा भार कमी करण्याकडे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील ग्राहकांचा कल वाढला आहे. ‘पीएम सूर्यघर मोफत बिजली योजने’त महावितरणच्या नागपूर परिमंडळाने ५०० मेगावॅट स्थापित क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे. तब्बल १ लाख ३१ हजारांहून अधिक ग्राहकांनी सौर प्रकल्प उभारले असून, १ लाख १९ हजार २६७ ग्राहकांच्या खात्यात ९२७.८४ कोटी रुपयांचे अनुदान जमा झाल्याची माहिती महावितरणने दिली. पण नागपूर आणि वर्ध्याचा यात नेमका किती वाटा आहे? याबाबत आपण जाणून घेऊ या.

नागपूर परिमंडळाने किती क्षमता गाठली?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूर शहरातील आहेत. त्यांच्या शहरात येणाऱ्या महावितरणच्या नागपूर परिमंडळातील १ लाख ३१ हजार २४९ ग्राहकांच्या सौर प्रकल्पांची स्थापित क्षमता ५०१.०१ मेगावॅटवर पोहोचली आहे. त्यामुळे परिमंडळ राज्यात अव्वल असल्याचा महावितरणचा दावा आहे.

नागपूर आणि वर्ध्यात किती सौर प्रकल्प आहेत?

नागपूर जिल्ह्यातील १ लाख ८ हजार ८२० ग्राहकांनी ४१८.६३ मेगावॅट, तर वर्धा जिल्ह्यातील २२ हजार ८४२ ग्राहकांनी ८२.३८ मेगावॅट क्षमता गाठल्याची माहिती देण्यात आली आहे.

ग्राहकांना किती अनुदान मिळाले?

पीएम सूर्यघर योजनेत सौर प्रकल्पाच्या क्षमतेनुसार केंद्र सरकारकडून ३० हजार ते ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळते. नागपूर जिल्ह्यातील ९८ हजार ३७१ ग्राहकांच्या खात्यात ७६६.६३ कोटी, तर वर्ध्यातील २० हजार ८९६ ग्राहकांच्या खात्यात १६१.२१ कोटी रुपये जमा झाल्याचे महावितरणने म्हटले आहे.

अडीच हजार रुपयांत सौर प्रकल्प कोणाला मिळू शकतो?

राज्याच्या ‘स्मार्ट’ योजनेत ३० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांचा एक किलोवॅट प्रकल्पासाठीचा हिस्सा २,५०० रुपये आहे. अनुसूचित जाती-जमातींसाठी ५ हजार, तर इतर मागासवर्गीय आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी १० हजार रुपये हिस्सा निश्चित आहे.

सौर प्रकल्पामुळे फायदा काय?

घरात तयार झालेली वीज स्वतः वापरता येते. अतिरिक्त वीज नेट मीटरिंगद्वारे महावितरणच्या जाळ्यात दिली जाऊ शकते. त्यामुळे वापर आणि वीजनिर्मितीच्या प्रमाणानुसार वीजबिल कमी करण्यास मदत होते. अद्याप लाभ न घेतलेल्या पात्र ग्राहकांनी पीएम सूर्यघरच्या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.