मुंबईतील मालाड मढ किनाऱ्यावर चार दिवसांपूर्वी वाहून आलेल्या दुर्मिळ ‘लॉगरहेड’ कासवाला न्युमोनिया झाल्याचे निदान झाले आहे. निसर्गाचे संवर्धन करणारी आंतरराष्ट्रीय संस्था आययुसीएनच्या (इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर) लाल यादीत या कासवाची संकटग्रस्त म्हणून नोंद आहे. महाराष्ट्रात या कासवाच्या आतापर्यंत आठ नोंदी झाल्या आहेत.

बुधवारी स्थानिक मच्छिमारांना मढ किनाऱ्यावर हे कासव आढळून आल्यानंतर त्यांनी ते कांदळवन कक्षाच्या सुपूर्द केले. त्यानंतर हे कासव ऐरोलीतील किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्रात आणून त्यावर उपचार करण्यात आले. ‘लॉगरहेड’ कासव किनारपट्टीला नाही तर खोल समुद्रात आढळते. मात्र, हे कासव किनारपट्टीला आढळून आले. तसेच त्याच्या पाठीवर जखमाही होत्या. बोटीच्या पंख्याची धडक त्याला लागली असावी, असा डॉक्टरांचा अंदाज आहे. आतापर्यंत महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर आढळून आलेल्या ‘लॉगरहेड’ कासवांपैकी हे आकाराने सर्वात मोठे आहे. ऑगस्ट महिन्यात चारवेळा ही कासवे आढळून आली. १२ आणि १३ ऑगस्टला दिवेआगर किनाऱ्यावर दोन तर उरण तालुक्यातील कारंजा खाडीत १६ ऑगस्टला एक आणि आता १७ ऑगस्टला हे कासव आढळून आले. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत बहादूरे हे या कासवाच्या उपचारावर लक्ष ठेवून आहेत. कासवाला पूर्णपणे बरे होण्यासाठी बराच कालावधी लागेल, असे त्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकांचे म्हणणे आहे.

कांदळवन कक्षाच्या सागरी प्राणी बचाव आणि सुटका समितीच्या निर्देशानुसारच त्या कासवाची नैसर्गिक अधिवासात सुटका करण्यात येईल, असे कांदळवन कक्षाच्यावतीने सांगण्यात आले.