scorecardresearch

यवतमाळ : त्याने दगा दिला, तिने विष प्राशन करून गर्भातील बाळासह जीव दिला!

जग प्रेम दिवस साजरा करत असताना तिने विषाचा प्याला ओठांना लावला आणि गर्भात अंकुरत असलेल्या जीवासह स्वत:ही मृत्यूस कवटाळले!

poison Gave life with the unborn child
(फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

यवतमाळ : ‘तो’ विवाहित आहे, हे माहिती असूनही त्याच्या गोड बोलण्यावर आणि त्याच्याकडून मिळत असलेल्या प्रेमावर ‘ती’ भाळली. प्रेमाच्या आणाभाका घेतल्यानंतर त्यांनी एकमेकांना सर्वस्व अर्पण केले. त्याने तिला लग्न करण्याचा शब्द दिला. जेव्हा तिच्या गर्भात त्यांच्या प्रेमाचे प्रतिक अंकुरत असल्याचे दिसले तेव्हा मात्र त्याने शब्द फिरवला. ‘तो मी नव्हेच!’ असा पवित्रा त्याने घेतला. त्याच्या या दगाफटक्याने ती आतून-बाहेरून तुटली. जग प्रेम दिवस साजरा करत असताना तिने विषाचा प्याला ओठांना लावला आणि गर्भात अंकुरत असलेल्या जीवासह स्वत:ही मृत्यूस कवटाळले!

हृदय पिळवटून टाकणारी ही प्रेमकथा वणी तालुक्यातील कळमना या गावात घडली. श्वेता (२१) असे या प्रेमकथेतील मृत तरुणीचे नाव आहे. तर सचिन रमेश नवले (३०) या तरूणाविरूद्ध शिरपूर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्याला श्वेताच्या मृत्यूप्रकरणी अटक केली. शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कळमना येथील विवाहित असलेल्या सचिनने गावतच राहणाऱ्या श्वेतास लग्नाचे आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले. सचिन लग्न करणारच आहे, या भ्रमात असलेल्या श्वेताने सचिन म्हणेल तेव्हा सर्वस्व त्याला अर्पण केले. गेल्या दोन वर्षांपासून सचिने तिचे शोषण करत होता. यातूनच श्वेता गर्भवती राहिली.

हेही वाचा >>> “शेतकऱ्यांच्या जमिनी लिलावात घेणाऱ्यांचे हातपाय तोडू”; बच्चू कडूंचा इशारा…

सचिनच्या प्रेमाचा अंकुर गर्भात वाढत असल्याने आणि सचिन विवाह करणार असल्याने ती आनंदात होती. तिने ही बाब सचिनला सांगितली. तेव्हा सचिनने हात वर केले. श्वेताने लग्नाचा हट्ट धरला, मात्र सचिनने लग्नास नकार दिला. त्यामुळे आता गर्भातील जीवाचे काय होईल, या भीतीने श्वेता निराश झाली. त्याच नैराश्यातून तिने १४ फेब्रुवारी हा ‘व्हॅलेंटाईन डे’चा मुहूर्त शोधला आणि सायंकाळी घरीच विष प्राशन केले. ही बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांनी श्वेताला चंद्रपूर येथील सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी श्वेता आठ महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती कुटुंबीयांना दिली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. अति विष प्राशनामुळे बाळाचा गर्भातच मृत्यू झाला होता. त्यानंतर १९ फेब्रुवारीला श्वेतानेही अखेरचा श्वास घेतला. सोमवारी २० फेब्रुवारी रोजी कळमना येथे श्वेतावर अंत्यसंस्कार करण्यात आले. श्वेताच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सोमवारी शिरपूर पोलिसांनी याप्रकरणी आरोपी सचिन नवले याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्याला अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर कांडुरे करीत आहेत. एका प्रेमकथेचा असा करूण अंत झाल्याने सर्वजण हळहळले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-02-2023 at 15:06 IST