परतवाडा नजीकच्‍या कारंजा बहिरम येथील पंचशील आदिवासी आश्रमशाळेतील ३४ मुलींना विषबाधा झाल्‍याचे समोर आले आहे. या मुलींना आश्रमशाळेतील शिक्षकांनी लगेच अचलपूर येथील उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल केले. त्‍यापैकी एका विद्यार्थिनीला अमरावती येथील रुग्‍णालयात हलविण्‍यात आले असून चार विद्यार्थिनींना उपचारानंतर लगेच सुटी देण्‍यात आली. विषबाधा नेमकी कशामुळे झाली, हे अद्याप स्‍पष्‍ट होऊ शकले नाही.

हेही वाचा >>> नवी मुंबई : पामबीच मार्गावर गाडी चालवताय पण जरा जपून … वेगवान मार्गावर पथदिव्यांची डोळेझाक सुरु

कारंजा बहिरम येथील आदिवासी आश्रमशाळेत या परिसरातील मुली निवासी शिक्षण घेतात. शुक्रवारी रात्री या विद्यार्थिनींना विषबाधा झाल्‍याचे निदर्शनास आले. शिक्षकांनी लगेच धावपळ करून त्यांना अचलपूर उपजिल्‍हा रुग्‍णालयात दाखल केले. डॉक्‍टरांनी ३० मुलींवर औषधोपचार सुरू केले. एका मुलीची प्रकृती चिंताजनक वाटल्‍याने तिला अमरावती येथे पाठविण्‍यात आले. या मुलींची प्रकृती धोक्‍याबाहेर असल्‍याचे सांगण्‍यात आले.

हेही वाचा >>> नवी मुंबई : भाज्यांचे दर वाढल्याने गृहिणींची आर्थिक कोंडी

या मुलींना शुक्रवारी रात्री जेवण केल्‍यानंतर उलटी, जुलाब, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास जाणवायला लागला. मुलींची प्रकृती स्थिर असून त्‍यांच्‍या तब्‍येतीत सुधारणा होत आहे. दरम्‍यान, आठ मुलींना शनिवारी रुग्‍णालयातून सुटी देण्‍यात आली. पंचशील आदिवासी आश्रमशाळेत वर्ग १ ते १२ पर्यंत ५९७ विद्यार्थी आहेत. या सर्व मुला-मुलींनी शुक्रवारी सोबतच जेवण घेतले, मुलांना कुठलाही त्रास जाणवला नाही. मात्र ३४ विद्याार्थिनींना विषबाधा झाली.