येथे देशी कट्टा घेऊन दरोडा टाकण्याच्या उद्देशाने पुसद येथून आलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी कारागृह परिसरातून ताब्यात घेतले. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. या टोळीकडून एक देशी कट्टा, जिवंत काडतूस व चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. हेही वाचा >>> अकोला : शास्तीच्या सहा कोटींचे समायोजन होणार; महापालिकेकडून दिलासा; शेवटच्या टप्प्यात कर वसुलीचा जोर राम जगदीश रावळ (२१), गजानन प्रेमसिंग राठोड, दिनेश सुरेश जयस्वाल, जितेश सुभाष कनाके अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर देवा वाघमारे हा घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. या कारवाईमुळे मोठी गंभीर घटना टळली. कुणाला संशय येऊ नये म्हणून या टोळक्याने आपले वाहन चक्क कारागृह परिसरात उभे केले होते. या टोळीच्या हालचालींची गोपनीय माहिती अवधूतवाडी पोलिसांना मिळाली. त्या आधारावर ही कारवाई करण्यात यश आले. पुसद येथील टोळी कारागृह परिसरात संशयास्पदरीत्या उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक पवन राठोड यांनी तत्काळ सापळा रचला. पोलीस शिपाई अजय भुसारी, सुरेश मेश्राम, गजानन वाटमोरे, गजानन दुधकोहळे, सुरज शिंदे, बलराम शुक्ला, बबलू पठाण यांनी गोपनीय पद्धतीने घेरा टाकून या टोळीला अटक केली. अंगझडतीत राम रावळ याच्याजवळ देशी कट्टा व एक राऊंड सापडला. या प्रकरणी अवधूतवाडी पोलीस ठाण्यात चारही आरोपीविरोधात हत्यार बाळगणे व दरोड्याचा प्रयत्न करणे अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले.