यवतमाळ : बँकेतून काढलेली रक्कम लुटण्यात तरबेज असणाऱ्या दोन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. लुटीची रक्कम घेऊन दारव्हा मार्गे पसार झालेल्या या भामट्यांना लाडखेड पोलिसांनी पाठलाग करून पकडले त्यांच्या अटकेसाठी विदर्भातील पोलिसांनी जंग पछाडले होते. आंतरराज्यीय असलेल्या अट्टल चोरट्यांनी विदर्भात धुमाकूळ घातला आहे.
प्रविणकुमार मेकाला दास (२७) तसेच रोड्डा दासु रोड्डा बाबू (३४) दोघेही रा.बिरगुंटा ता.दारवरम, जिल्हा नेल्लोर, आंध्रप्रदेश अशी लाडखेड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. प्रविणकुमार मेकाला दास तसेच रोड्डा दासु रोड्डा बाबू या दोन सराईत गुन्हेगारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बँक परिसरात पाळत ठेवून रोख रक्कम उडविण्यात त्यांचा हातखंडा आहे. त्यांनी यापूर्वी भंडारा, गोंदिया, नागपूर, वाशिम आणि अकोला या जिल्ह्यातही लुटमारी केली आहे. हे दोन चोरटे यवतमाळ पोलिसांच्या हाती लागल्याचे कळताच या आरोपींना कोठडी मिळावी म्हणून पाच जिल्ह्यातील पोलिसांनी यवतमाळात धडक दिली. या दोघांनी पुसद शहरात दोन गुन्हे व उमरखेडमध्ये एक गुन्हा केल्याची कबुली दिली.या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी त्यांनी मूर्तिजापूर येथून चोरल्याचेही पुढे आले आहे. या आरोपींचा ताबा मिळावा यासाठी गोंदिया पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे.
नेल्लोर जिल्ह्यातील अनेक गावातील तरुण भारतात अनेक राज्यात चोरीच्या व्यवसायात असल्याची माहिती या घटनेने पुढे आली आहे. बँकेतून पैसे काढणाऱ्या लोकांवर हे भामटे पाळत ठेवून असायचे. अशाच प्रकारे लुटमार केल्याचे इतर जिल्ह्यातील घटनांतून पुढे आले आहे.या घटनेला मूर्तरूप देण्यासाठी त्यांनी चोरीची दुचाकी वापरली.याशिवाय भंडारे यांची दुचाकी पंक्चर करणे, हासुद्धा लुटीचा भाग असल्याचे बोलल्या जात आहे. ज्येष्ठांनी बँकेतून पैसे काढतेवेळी आपली सुरक्षा जपण्याची आवश्यकता या घटनेने पुढे आली आहे.
यवतमाळात घडलेल्या ज्या घटनेने हा प्रकार उघड झाला, ती घटनाही सिनेस्टाईल घडली. सिद्धेश्वर नगरातील अशोक भंडारे (७७) यांनी स्टेट बँकेतून एक लाख रुपये काढले. यापैकी ४० हजार रुपये एका खासगी फायनान्स कंपनीत भरल्यानंतर उरलेली ६० हजार रुपयांची रक्कम घेऊन ते घराकडे निघाले होते. परंतु, वाटेतच त्यांची दुचाकी पंक्चर झाली. पुढे पंक्चर काढल्यानंतर दुकानदाराला पैसे देण्यास त्यांनी गाडीतून पैसे काढले असता त्यांच्या पाळतीवर असलेल्या एका आरोपीने त्यांची बॅग हिसकावून पळ काढला. तर दुसरा आरोपी हा पुढे दुचाकी घेऊन उभा होता. पैश्याची बॅग घेऊन त्या दोघांनीही दारव्हामार्गे पोबारा केला. ही घटना स्टेट बँक चौकात मित्रांसमवेत बोलत असलेले पोलीस कर्मचारी विशाल भगत यांना लक्षात आली. त्यांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला, आणि घटनेची माहिती शहर, अवधूतवाडी, लोहारा पोलिसांना दिली. चोरटे दारव्हा मार्गाने पसार झाल्याने लाडखेड पोलिसांना घटनेची माहिती दिली.
लाडखेड पोलिसांनी नाकेबंदी केली. पोलिसांना बघून चोरट्यांनी दुचाकी सोडून शेतात पळ काढला. मात्र हे दोन भामटे पोलिसांच्या जाळ्यात अडकले. अटकेकनंतर त्यांनी दहा गुन्ह्यांची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप, लाडखेड ठाणेदार विनायक लांवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण सहाय्यक पोलीस निरीक्षक मिलिंद सरकटे, पोलीस उपनिरीक्षक गणेश सपकाळ, हवालदार रावसाहेब शेंडे, किरण पडघन, प्रदीप कुरडकर,पवन नांदेकर तसेच अभिषेक वानखेडे यांनी केली.