नागपूरमध्ये राणा दाम्पत्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस हनुमान चालिसा पठणावरून आमनेसामने येताना दिसत आहे. राष्ट्रवादीने नागपूरच्या ज्या मंदिरात ज्या दिवशी हनुमान चालिसा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला, त्याच दिवशी खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा देखील हनुमान चालिसा पठण करणार आहेत. यासाठी दोन्ही गटांकडून पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागण्यात आली. यावर नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दोन्ही गटांना हनुमान चालिसा म्हणा, मात्र भोंग्यांना परवानगी नाही, असे स्पष्टपणे सांगितले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि राणा दाम्पत्य शनिवारी (२८ मे) नागपूरमध्ये रामनगरातील हनुमान मंदिरात हनुमान चालिसा पठण करणार आहेत. त्यासाठी त्यांना पोलीस प्रशासनाने परवानगीही दिली आहे. मात्र, कुणालाही भोंग्याचा वापर करता येणार नाही. मंदिरात हनुमान चालिसा पठणासाठी परवानगीची गरज नाही, मात्र बाहेर कार्यकर्त्यांच्या गर्दीमुळे काही अनुचित घटना घडणार नाही याची काळजी घेण्याची सूचना दोन्ही आयोजकांना दिली आहे.

याखेरीज राणा दाम्पत्याने पोलिसांकडे विमानतळ ते मंदिरापर्यंत रॅली काढण्यासाठी परवानगी मागितली होती. पोलिसांनी राणा दाम्पत्याच्या रॅलीला परवानगी नाकारली आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी पक्षातर्फे हनुमान चालिसा पठण केले जाईल. त्यानंतर राणा दाम्पत्याला परवानगी दिली जाईल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

नवनीत राणा विरुद्ध राष्ट्रवादीचे ११ पुजारी, ४० भोंगे

राष्ट्रवादी काँग्रेसने नागपुरातील रामनगर येथील हनुमान मंदिरात शनिवारी हनुमान चालिसा, सुंदर कांड आणि हवनचे आयोजन केले असून त्यासाठी ११ पुजारी आणि ४० भोंगे अशी जय्यत तयारी केली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत पवार यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसने महागाई, बरोजगारीपासून देशाच्या जनतेला दिलासा देण्याची सदबुद्धी केंद्र सरकारला यावी म्हणून आम्ही हनुमानाला साकडे घालत आहोत. आमचा हनुमान चालिसा पठनचा कार्यक्रम मागच्या शनिवारी ठरला होता, परंतु राष्ट्रवादीचे नेते शहराबाहेर असल्याने तो पुढे ढकलण्यात आला. त्याची सूचना अंबाझरी पोलीस ठाण्याला पत्राद्वारे २५ मे रोजी देण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : राणा दाम्पत्य ३६ दिवसांनंतर परतणार मतदार संघात, २८ मे रोजी होणार अमरावतीत आगमन

दरम्यान, याच दिवशी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा त्यांच्या कार्यकर्त्यांसह याच मंदिरात हनुमान चालिसा पठन करणार आहे. त्यासंदर्भात राष्ट्रवादी शहर काँग्रेसचे अध्यक्ष दुनेश्वर पेठे म्हणाले, कोणीही कोणत्याही मंदिरात पूजा-पाठ करू शकतो. आमचा कार्यक्रम आधी ठरला होता. आमचा कार्यक्रम झाल्यानंतर ते करतील. त्यात काहीच वावगे नाही. परंतु आमच्या कार्यक्रमादरम्यान त्यांनी घुसखोरी केल्यास राष्ट्रवादी ते खपवून घेणार नाही. जशाच तसे उत्तर देण्याची धमक राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, असे सांगून त्यांनी संघर्ष अटळ असल्याचे संकेत दिले.

राणा दाम्पत्यांचे नागपुरात शक्तीप्रदर्शनाचे प्रयत्न

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना जामीन मिळाल्यानंतर दिल्लीत दाखल झाले. तेव्हापासून ते पहिल्यांदा आपल्या मतदार संघात येत आहेत. त्यासाठी ते नागपूरमार्गे अमरावतीकडे रवाना होत आहे. त्यादरम्यान त्यांनी बाजीप्रभू चौक, रामनगर येथे हनुमान चालिसा पठनच्या कार्यक्रम आयोजन केले आहे. या निमित्ताने राणा दाम्पत्यांना शक्तीप्रदर्शन करावयाचे आहे. त्यासाठी त्यांनी विमानतळ ते रामनगर अशी रॅली काढली जाणार आहे. त्यासाठी शेकडो कार्यकर्त्यांना नागपुरात बोलावण्यात आले आहे.