बुलढाणा : आदित्य ठाकरे यांची बुलढाण्यातील जाहीर सभा बारगळल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चिखलीतील सभेला पोलिसांनी सशर्त परवानगी दिली आहे.शिवसेनेतील बंडखोरीत बुलढाण्याचा मोठा वाटा आहे. जिल्ह्यातील आमदार संजय गायकवाड व संजय रायमूलकर हे दोघेही गुजरातपासून एकनाथ शिंदे यांच्यासमवेत होते. त्यापाठोपाठ खासदार प्रतापराव जाधव आणि सिंदखेडराजा माजी आमदार शशिकांत खेडेकर हेही शिंदे गटात दाखल झाले. यामुळे बुलढाणा जिल्ह्यतील बंडखोर ‘मातोश्री’च्या लक्ष्यावर आहे. नोव्हेंबर महिन्यात ठाकरे पिता-पुत्रांनी निष्ठा वा संवाद यात्रेला बुलढाणा जिल्ह्यापासून सुरुवात करण्याचे जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आदित्य ठाकरेंच्या ७ नोव्हेंबरला बुलढाणा व मेहकर या ठिकाणी सभांचे नियोजन होते. त्यांची मेहकरातील सभा जंगी ठरली. मात्र बुलढाण्यातील गांधी भवन या स्थळी सभा घेण्यास पोलिसांनी परवानगी नाकारली. कायदा-सुव्यवस्थाच्या कारणावरून स्थळ नाकारले तरी ठाकरे गटाने बुलढाण्यातच अन्यत्र सभा घेण्याचे टाळले. त्याऐवजी येथून २५ किलोमीटर अंतरावरील मढ येथे शेतकरी संवाद कार्यक्रम घेण्यात आला. यामुळे वादंग उठले होते.आता उद्धव ठाकरे यांची २६ नोव्हेंबरला चिखली येथील तालुका क्रीडा संकुलात सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला पोलिसांनी परवानगी दिली आहे. पक्षाचे पदाधिकारी कपिल खेडेकर यांना तसे लेखी कळविण्यात आले आहे. मात्र, त्यातही प्रवेशद्वारसह अनेक अटींची मेख आहे.

हेही वाचा : मला मते द्या, अथवा देऊ नका, मी कामे करीतच राहणार; नितीन गडकरी

उद्धव ठाकरे यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा आहे. मात्र सभास्थळ असलेल्या क्रीडा संकुलात एकच प्रवेशद्वार आहे. त्यामुळे सुरक्षेच्या कारणावरून व्यासपीठच्या अगदी जवळून दुसरे प्रवेशद्वार असणे आवश्यक असल्याचे परवानगीत नमूद करण्यात आले आहे. दुसरे प्रवेशद्वार तयार करू असे ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, असे सूचित करण्यात आले आहे. याशिवाय ‘बाळासाहेब ठाकरे अमर रहे, उद्धव ठाकरे आगे बढो’ या दोनच घोषणा द्याव्यात व मशाल जाळण्यासाठी स्फोटक-ज्वलनशील पदार्थ बाळगू नये, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सभेत कोणाच्याही भावना दुखावतील असे फलक लावू नये, कोणत्याही व्यक्ती-जाती धर्माच्या भावना दुखविणारी वक्तव्ये करू नये, वक्त्यांची व बाहेरून येणाऱ्या नेत्यांची माहिती पोलिसांना द्यावी, ध्वनिप्रदूषण होणार नाही व ‘आवाज’ ५० डेसीबलपेक्षा जास्त नको, आदी अटींवर पोलिसांनी सभेला परवानगी दिली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Police give conditional permission to uddhav thackeray meeting in chikhli buldhana tmb 01
First published on: 13-11-2022 at 10:36 IST