लोकसत्ता टीम
नागपूर: नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याच्या फार्महाऊसमध्ये सुरु असलेल्या दारु पार्टीत पोलिसांनी छापा घातला. तेथे नृत्य करणाऱ्या तरुणींसह काही व्यक्तींना ताब्यात घेतले. मात्र, कोणतीही कारवाई न करता सोडून देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नवीन कामठी पोलीस ठाण्यात या छाप्याबाबत कोणतीही नोंद नसल्याची माहिती ठाणेदार क्षीरसागर यांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्यापारी अग्रवाल यांच्या फार्महाऊसवर काही व्यापारी पार्टी करीत असल्याची माहिती नवीन कामठी पोलिसांना मिळाली. मध्यरात्रीच्या सुमारास पोलिसांचे वाहन फार्महाऊसवर पोहचले. त्यांनी पार्टीतून दारुच्या बाटल्या आणि तेथे नृत्य करणाऱ्या तरुणींना ताब्यात घेतले. त्यानंतर कोणतीही कारवाई न करता त्यांना सोडून दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
आणखी वाचा- सावधान.. जी- २० परिषदेवर ‘एच ३ एन २’, ‘करोना’चे सावट!
पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर यांनी या घटनेला दुजोरा दिला असून पोलिसांना फार्महाऊसवर केवळ दारु पिताना काही व्यक्ती आणि तरुणी आढळल्याचे सांगितले. या प्रकरणाची नोंद पोलीस ठाण्यात नाही, हे विशेष.