चंद्रपूर : ब्रह्मपुरीचे वादग्रस्त उपविभागीय पोलीस अधिकारी (एसडीपीओ) राकेश जाधव यांनी अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रकचालकाकडून ५० हजार रुपये रोख रक्कम घेतल्याचा उल्लेख चौकशी अहवालात आहे. पोलीस अधीक्षकांनी हा अहवाल पोलीस महासंचालकांकडे पाठवला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जाधव यांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.
जाधव यांनी २८ ऑक्टोबर २०२५ रोजी वाळूची तस्करी करणारा एमएच-३६ एए-९९३३ क्रमांकाचा ट्रक पकडला होता. यात ट्रकमालक आणि जाधव यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची तक्रार पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. त्यांनी याप्रकरणाची चौकशी अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्यावर सोपवली. कातकडे यांच्या अहवालात जाधव यांनी ट्रकचालकाकडून ५० हजार रुपये रोख स्वीकारल्याचा उल्लेख आहे.
दरम्यान, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्र गस्तीदरम्यान जाधव यांनी वाळूची अवैधरित्या वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला होता. जाधव यांनी ट्रॅक्टर नागभीड ठाण्यात आणला असता एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याने ठाण्यात पोहोचून एका लोकप्रतिनिधीला फोन केला. त्यानंतर संबंधित लोकप्रतिनिधीने जाधव यांना दमदाटी केली.
परिणामी ट्रॅक्टर चालकावर केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन म्हणून दोन हजार रुपयांचा किरकोळ दंड आकारून सोडून देण्यात आले. याबाबत गोपनीय तक्रार झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणातही आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा संशय आहे.
