नागपूर : शासकीय नोंदणीकृत बालगृहात जबरदस्तीने प्रवेश करून तेथील बालकांचे व्हिडिओ चित्रीकरण करत ते समाजमाध्यमांवर व्हायरल केल्याप्रकरणी नगरसेवक वसीम खानसह कासीफ भारतीय व समीर शेख विरोधात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बालकल्याण समिती  (न्यायिक दर्जा) च्या आदेशानुसार कपीलनगर पोलिसांनी ही कारवाई केली.

कॉँग्रेस नगरसेवक वसीम खान हा काही सहकाऱ्यांसह कोणतीही पूर्वपरवानगी न घेता संबंधित बालगृहात घुसला. यावेळी त्याने  तेथील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांचे व्हिडिओ चित्रीकरण केले. अल्पवयीन मुलांसंबंधी कायद्याचे उल्लंघन करत त्याने हे व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित केल्याने बालकांच्या गोपनीयतेचा भंग झाल्याने त्यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला. या घटनेमुळे बालगृहात भीतीचे वातावरण निर्माण झाले. बालगृहातील जबरदस्तीने प्रवेश करून अल्पवयीन मुलांचे संवैधानिक अधिकार हनन झाल्या प्रकरणात बालगृहातील कर्मचारी स्वाती पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार कपिल नगर पोलीसांनी नगरसेवकासह अन्य जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणात नगरसेवक वसीम खान सोबतच, समाज माध्यमांवर बालकांचे व्हिडिओ प्रसारित करणारे कासीफ भारतीय व समीर शेख विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम तसेच भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमांनुसार ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बालकल्याण समितीने या घटनेची गंभीर दखल घेत बालकांच्या हक्कांचे व गोपनीयतेचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले असून, अशा प्रकारच्या कृत्यांमुळे बालगृहातील मुलांच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे मत व्यक्त केले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास कपिल नगर पोलीस करत असून, दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.