रेल्वे स्थानक व परिसरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ

उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावरील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली

Nagpur railway station

धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजयादशमी उत्सव
धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि विजयादशमी उत्सवाच्या पाश्र्वभूमीवर मध्यवर्ती नागपूर रेल्वे स्थानकावरील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर गुप्त पोलीस लक्ष ठेवून आहेत.

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी देशविदेशातून मोठय़ा संख्येने अनुयायी येतात, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी कार्यक्रम रेशीमबाग मैदानावर असतो. धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी दोन दिवसांपासून नागपूरकडे येणाऱ्या रेल्वेगाडय़ांना गर्दी होते. त्यामुळे विशेष गाडय़ाही सोडण्यात येतात. रेल्वे स्थानकावर या काळात प्रवाशांचा अतिरिक्त भार असतो. या गर्दीचा फायदा असामाजिक घटकांकडून घेतला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागपूर रेल्वेस्थानक आणि अजनी रेल्वेस्थानकावरील बंदोबस्ताकरिता मुंबई, पुणे येथील अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर आणि रेल्वे स्थानकाबाहेर पडण्याच्या मार्गावर जवान तैनात करण्यात आले आहेत.

मंगळवारी दसरा उत्सवादरम्यान नांदेड येथे शीख बांधवांतर्फे हा उत्सव मोठय़ा प्रमाणात साजरा केला जातो. त्यात सहभागी होण्यासाठी देशभरातील शीख बांधव नांदेडमध्ये येतात. त्यांचा मार्गही नागपूर असतो, तर बुधवारी १२ ऑक्टोबरला मुस्लीम बांधवातर्फे मोहरम सण देशभरात साजरा करण्यात येणार आहे.

सध्या देशात दहशतवादी व नक्षलवादी कारवाया सुरू आहेत. या पाश्र्वभूमीवर गर्दीचा फायदा घेत घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून नागपूर लोहमार्ग पोलिसांनी जिल्ह्य़ात चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यात नागपूर, अजनी रेल्वेस्थानकावर चोख बंदोबस्त करण्यात आला. बॉम्बशोधक व नाशक पथक व श्वान पथकाद्वारे रेल्वेस्थानक परिसर आणि गाडय़ांची कसून तपासणी केली जात आहे. संशयितांवर नजर ठेवण्यात येत आहे. याशिवाय, मुंबई आणि पुण्याहून अतिरिक्त ताफा मागवण्यात आला आहे. या विशेष बंदोबस्तासाठी तीन उपविभागीय पोलीस अधिकारी, पाच पोलीस निरीक्षक, १७ सहायक पोलीस निरीक्षक, ४४ पोलीस उपनिरीक्षक, ८४० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Police security increased in nagpur railway station area