वर्धा : राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्वत्र एकच झुंबड उडाली आहे. त्यातही लाडकी बहीण योजना चांगलीच गाजत आहे. सोबतच बांधकाम कामगारांना भांडी वाटप करण्याचा उपक्रम चर्चेत आहे. भांडी घेण्यासाठी प्रामुख्याने नोंदणी झालेल्या कामगारांची झुंबड उडत असल्याचे व त्यामुळे चेंगराचेंगरी होत असल्याचे दिसून येत आहे. लाभ मिळावा म्हणून आलेल्या भगिनींना काही ठिकाणी विन्मुख होत घरी जाण्याची आपत्ती ओढवली.

कानगाव, कोसूरला या भागातील काही गावे प्रशासकीयदृष्ट्या हिंगणघाट तालुक्यात येतात. मात्र मतदार म्हणून त्यांची नोंदणी देवळी तालुक्यात झाली आहे. भांडी वाटप होत असल्याने या परिसरातील काही कामगार महिला भांडी घेण्यास पोहचल्या. काहींना लाभ मिळाला. मात्र गर्दी झाल्यावर वेगळाच निकष पुढे आल्याची चर्चा झाली. भांडी मिळू न शकलेल्या महिलांना तोंडी सांगण्यात आले की तुम्ही हिंगणघाट तालुक्यातील असल्या तरी मतदार देवळीच्या असल्याने आता तुमचा विचार होणार नाही. तुम्ही तिकडेच जा, असे सांगण्यात आले. ही बाब राजकीय दबावातून झाल्याचे बोलल्या जाते.

हेही वाचा…“बच्‍चू कडू सुपारी बहाद्दर नेते….”, नवनीत राणा यांची टीका

हिंगणघाट येथील तहसीलदार योगेश शिंदे म्हणाले की ही योजना कामगार कार्यालयामार्फत राबविल्या जाते. आमचा हस्तक्षेप नसतोच. केवळ गोंधळ उडू नये व कायदा सुव्यवस्था ही बाब आम्ही लक्षात घेतो.

जिल्हा कामगार अधिकारी सिद्धेश्वर फड म्हणाले, एकही नोंदणीकृत कामगार बंधू किंवा भगिनी वंचित राहणार नाही. तहसीलनिहाय वाटप सूरू आहे. सर्व ती काळजी घेऊ. नोंदणी झाली पण भांडी मिळाली नाही, अशी तक्रार येणार नाही. अद्याप वाटप करण्यासाठी जागा शोधणे सुरूच आहे. जिथे उपलब्ध नसेल तिथे प्रसंगी शाळा इमारतीत परवानगी घेऊन वाटप करणार. घोळ झाल्याची तक्रार तपसल्या जाईल.

हेही वाचा…लखपती दीदी, लाडकी बहीण खूप झाले, उमेदवारीचे बोला! राजकीय पक्षांवर…

दरम्यान सेना ठाकरे गटाने हिंगणघाट उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन देत राजकीय हस्तक्षेप थांबविण्याची विनंती केली. शासनाच्या गरजू लोकांसाठी योजना असतात.मात्र प्रशासनावर दबाव टाकून स्वतःचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न यातून होत आहे. नियमात नसतांना अनेक वाटप होत आहे, असे सेना नेत्यांनी स्पष्ट केले.चंद्रकांत घुसे, सतीश धोबे, मनीष देवढे, सीताराम भुते, प्रकाश अनासने व अन्य नेत्यांनी भूमिका मांडली.