नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांना भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा मात दिली आहे. या मतदारसंघात २०१९ पासून पटेल विरुद्ध पटोले असा सामना जेव्हा जेव्हा झाला, तेव्हा पटोले यांची सरशी झाल्याचे दिसून येते.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारमध्ये राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्री पद देऊ करण्यात आले होते. मात्र, कॅबिनेट दर्जाचे मंत्रीपद हवे असल्याचे सांगून राष्ट्रवादीने ते नाकारल्याचे सांगण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांचे त्यांच्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातील राजकीय वजनाची चर्चा होऊ लागली आहे.

हेही वाचा…प्रेयसीला मित्राने केला प्रपोज, युवक संतापला अन् नंतर जे घडलं ते…

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने भंडारा-गोंदियाची जागा जिंकली. काँग्रेसचे डॉ. प्रशांत पडोळे यांनी भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांचा पराभव केला आणि २५ वर्षानंतर काँग्रेसने ही जागा परत मिळवली. या निवडणुकीत काँग्रेसकडून पडोळे उमेदवार होते. मात्र, प्रतिष्ठा पटोले यांची पणाला लागली होती.

कारण, पक्षाने पटोले यांना निवडणूक लढण्याची सूचना केली होती. परंतु त्यांनी डॉ. पडोळे यांचे नाव सुचवत त्यांना निवडून आणण्याची हमी घेतली होती. भाजपने विद्यमान खासदाराला उमेदवारी दिली असताना तसेच त्यांच्यासोबतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल असताना पटोले यांनी नवख्या पडोळे यांना उमेदवारी देऊन महायुतीसाठी मैदान मोकळे करून दिले, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. काँग्रेसवर ‘डमी’ उमेदवार दिल्याचा आरोपही झाला. परंतु, पटोले यांनी आपली पूर्ण शक्ती पणाला लावत काँग्रेसला ही जागा जिंकून दिली. काँग्रेसचा हा विजय भाजपपेक्षा प्रफुल्ल पटेल यांचा पराभव मानला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात प्रत्येकी एक आमदार आहे. पटेल या लोकसभा मतदारसंघाच्या भरवशावर दिल्लीत राजकारण करतात. परंतु पटोले यांनी पुन्हा एकदा पटेल यांना मात दिली आहे.

हेही वाचा…धक्कादायक..! नागपूर महापालिका म्हणते एकाही जीर्ण इमारतीवर जाहिरात फलक नाही

पटोले २०१४ च्या लोकसभेपासूनच पटेल यांच्यावर भारी पडले आहेत. २०१४ मध्ये पटोले यांनी भाजपकडून लढत पटेल यांना धूळ चारली होती. २०१८ मध्ये पटोले यांनी भाजपचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये प्रवेश केला. येथे पोटनिवडणूक झाली आणि मधुकर कुकडे निवडून आले. पटोले यांनी ताकद लावली आणि भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले. आता २०२४ मध्येही पटोले यांनी पटेल यांच्यावर मात केली.